अपंग कुटुंबासाठी मदतीचे हात सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:07 PM2018-04-06T23:07:08+5:302018-04-06T23:07:08+5:30
सामाजिक बांधीलकीच्या अनोख्या संकल्पनेतून अपंग कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी येथील नवआझाद मंडळ व गावकरी सरसावले. हनुमान जयंतीला गोळा झालेल्या राशीतून या अपंग कुटुंबास १ लाख ११ हजार १११ रुपये बँकेत सुरक्षा ठेव करून देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : सामाजिक बांधीलकीच्या अनोख्या संकल्पनेतून अपंग कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी येथील नवआझाद मंडळ व गावकरी सरसावले. हनुमान जयंतीला गोळा झालेल्या राशीतून या अपंग कुटुंबास १ लाख ११ हजार १११ रुपये बँकेत सुरक्षा ठेव करून देण्यात आली.
नांदगाव खंडेश्वर येथील पांडुरंग गोविंद दुधे यांचे वय ५८ वर्षे आहे. त्यांनी अपंगत्वामुळे दृष्टी गमावली. त्यांचा मुलगा उमेश (२०) हा दोन्ही पायांनी अपंग आहे. दुसरा मुलगा दीपक (१७) हा दोन्ही पायांनी व हातांनी अपंग आहे. या कुटुंबाचा पांडुरंगची पत्नी विमलाबाई हीच एकमेव आधार आहे. अशा या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी गावातील शेकडो हात सरसावले. यात मंडळाचे वासुदेव लोखंडे, कैलास चांदणे, नीलेश ब्राम्हणवाडे, रवींंद्र ठाकूर, मनोज खेडकर, नागेश चांदणे, नीलेश ईखार, दिनेश जोगदंडे, किशोर शिरभाते, मंगेश पचगाडे या युवकांनी गावकऱ्यांकडून मदत गोळा केली व छोट्याशा समारंभात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक सदानंद जाधव, माजी सैनिक मधुकरराव पातोडे, शहीद विकास उईके यांच्या आई बेबी उईके, ठाणेदार मगन मेहते, नारायणदास वैष्णव यांच्या हस्ते व गावकऱ्यांच्या साक्षीने आहेर करून सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील बरीच मंडळी हजर होती. तसेच यावेळी राधे-राधे ग्रुपची स्थापना करून अपंगांसाठी व वंचित घटकांसाठी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.