रस्त्यावरील मास्कला हातांचा स्पर्श; कसा न होईल संसर्ग ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:00 AM2020-11-07T05:00:00+5:302020-11-07T05:00:27+5:30
कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंग, हात धुणे या उपाययोजना अमरावतीकर विसरले. आता केवळ मास्क तोंडाला बांधला जात आहे, पोलिसांकडून होणाऱ्या दंडाच्या भीतीने. सणाच्या खरेदीला बाहेर पडलेले अमरावतीकर आता मास्कचे आकार-प्रकार, रंगसंगती पाहून ते मुद्दाम खरेदी करीत आहेत. ही बाब चांगली असली तरी तो मास्क तोंडाला लावण्यापूर्वी हाताळला जातो आणि पसंत न आल्यास परत केला जातो. या मास्क विक्रीबाबत शासनाचे कोणते निर्देश आहेत, याचा बहुतांश विक्रेत्यांना पत्ताच नसल्याचेही आढळून आले आहे.
मनीष तसरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाच्या सर्वाधिक धोकादायक काळात कुणाशी हस्तांदोलनही टाळणारे अमरावतीकर आता रस्त्यावर मास्क खरेदी करताना ते हाताने आलटून-पालटून पाहत खरेदी करतात. याद्वारे संसर्ग पसरू शकतो, याची ना त्यांना जाणीव, ना विक्रेत्यांना फिकीर आहे. हवेतूनदेखील पसरू शकणाऱ्या कोरोना विषाणूला शहरात खुली विक्री होत असलेल्या मास्कद्द्वरे त्रण मिळत आहे.
कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंग, हात धुणे या उपाययोजना अमरावतीकर विसरले. आता केवळ मास्क तोंडाला बांधला जात आहे, पोलिसांकडून होणाऱ्या दंडाच्या भीतीने. सणाच्या खरेदीला बाहेर पडलेले अमरावतीकर आता मास्कचे आकार-प्रकार, रंगसंगती पाहून ते मुद्दाम खरेदी करीत आहेत. ही बाब चांगली असली तरी तो मास्क तोंडाला लावण्यापूर्वी हाताळला जातो आणि पसंत न आल्यास परत केला जातो. या मास्क विक्रीबाबत शासनाचे कोणते निर्देश आहेत, याचा बहुतांश विक्रेत्यांना पत्ताच नसल्याचेही आढळून आले आहे.
पंचवटी चौकातील विक्रेत्याकडे उघड्यावरच मास्क लावले होते. सुरक्षेचे साधन म्हणून ५० मिलिपर्यंत असलेली सॅनिटायझरची बॉटल सदर प्रतिनिधीने त्याला विचारणा केल्यानंतर बाहेर निघाली. मास्कची खुल्या विक्रीबाबत अधिकारी विचारणा करतात का, या प्रश्नावर त्याने कोरोना जनजागृतीबाबत वाहन आता फिरकत नसल्याचे सांगितले. मास्कचे प्रकार वाढले, पण विक्री घटल्याचे त्याने स्पष्ट केले.
कठोरा नाक्यावर विक्रेत्याकडे मास्कची खुली विक्रीच सुरू होती. पण. मास्क प्लास्टिकच्या वेष्टणात बंद होते. मास्क पाहा, पसंत केल्यानंतर हाताने दर्शवा, असे निर्देश तो त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना देत होता. कोरोना कमालीचा संसगर्गजन्य असल्याने ही उपाययोजना केल्याचे त्याने सांगितले. येथे बहुतांश नोकरदार व आरोग्याची पुरेशी काळजी घेणारा वर्ग खरेदीसाठी येतो, असे निदर्शनास आले.
मालटेकडी रोडने रस्त्यावर लागलेल्या मास्क विक्रीच्या स्टॉलवर कुणीही यावे, मास्क हाताळावा आणि पुढे जावे, अशी अवस्था होती. मास्कला हात न लावण्याची सूचना कोरोनाबाबत बेफिकिरी असलेला विक्रेता देत नव्हता. बेजबाबदार ग्राहकदेखील खुशाल मास्क हाताळून व प्रसंगी परत देऊन निघून जात होते. शासनाने मास्कचे दर निश्चित केले असताना, २० रुपयांपेक्षा कमी किंमत कुठेही नव्हती.
ग्राहकांना काय वाटते?
खुले मास्क घेण्याची भीतीच वाटते. कारण कोरोना हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे. म्हणून प्लास्टीक पन्नीतील मास्कचा शोध घेतल्याची प्रतिक्रिया वेदश्री वाटाणे (रा. कठोरा नाका) यांनी दिली. शहरात विनामास्क फिरताना पोलिसांकडून दंडाची भीती राहते. लोक एका मास्कची खरेदी करतानाही त्याला हात लावतात. याबाबत राहुल आडे (रा. साईनगर) यांनी आश्चर्य व्यक्त केले.
मास्क खरेदी करताना ग्राहकांनी व विक्रेत्यांनी काळजी घ्यावयास हवी. मास्क ट्रायल करताना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. मास्क विक्रेत्यांवर कुठलेही नियंत्रण नाही.
- विशाल काळे
वैद्यकीय आरोग्य अधिकारी