आई-वडिलांच्या सुटकेसाठी लेकीची प्रार्थना, राणाकन्येचं हनुमान चालिसा पठण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:30 PM2022-04-28T12:30:49+5:302022-04-28T12:33:07+5:30
नवनीत राणा यांची 8 वर्षांची कन्या आरोही हिने अमरावतीतील निवासस्थानी हनुमान चालिसा पठण केले
अमरावती/मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोघांनाही आता २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्या कन्येसह त्यांच्या समर्थकांनी राणा दाम्पत्याच्या सुटकेसाठी हनुमान चालिसा पठण केले.
नवनीत राणा यांची 8 वर्षांची कन्या आरोही हिने अमरावतीतील निवासस्थानी हनुमान चालिसा पठण केले. आई-वडिलांची तुरुंगातून लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी हे पूजन, पठण केले.
महाराष्ट्र सरकार से स्वतंत्र लोकसभा सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा की 8 वर्षीय बेटी आरोही राणा ने अमरावती में अपने माता-पिता की जेल से जल्द ही रिहाई के लिए अपने आवास पर हनुमान चालीसा का पाठ किया। pic.twitter.com/Zehdl8xj75
— ANI_HindiNews (@AHindinews) April 28, 2022
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने धरला होता. त्यामुळे, मुंबई आणि अमरावती येथील राणांच्या निवासस्थानी शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्य बाहेर आल्यास आपण त्यांना हनुमान मंदिराचा प्रसाद देणार असल्याचं शिवसैनिक सांगत होते. त्यातूनच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. मात्र, या नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात कलम ३५३ गुन्हा दाखल करण्यात आला. याची नोंद वेगळ्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे.
२९ एप्रिल रोजी जामिनावर सुनावणी
राणा दाम्पत्यानं जामीनाच्या प्रयत्नांसाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. पण, न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामिनाच्या याचिकेवर २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतरच सुनावणीची तारीख ठरवू असं सत्र न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे राणा दाम्पत्याला आता २९ एप्रिलपर्यंत कोठडीतच राहावं लागणार आहे.