जीएसटीत अडकली हनुमानजींची दिवाबत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:02 PM2019-06-29T23:02:22+5:302019-06-29T23:02:56+5:30
अचलपूरमधील हनुमान मंदिराच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यम सामग्रीकरिता राजस्थान सरकार अनुदान देत आले आहे. तथापि, मागील १४ महिन्यांचे हे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूरमधील हनुमान मंदिराच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यम सामग्रीकरिता राजस्थान सरकार अनुदान देत आले आहे. तथापि, मागील १४ महिन्यांचे हे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे.
राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील ऋषभदेव येथील देवस्थान विभागाच्या सहायक आयुक्तांकडून हे अनुदान पाठविले जाते. अचलपूर शहरातील जयसिंगपुरा येथील हनुमानजी व महादेव मंदिराची (राजा की छत्री) राजस्थान सरकारकडे आहे. या मंदिरात दिवाबत्ती, भोगराग नैवेद्यम करण्याकरिता राजस्थान सरकारकडून पुजारी नियुक्त आहे. काही वर्षांपूर्वी लालबहादूरसिंह ठाकूर पुजारी होते. आता त्यांचा मुलगा सुरेशसिंह ठाकूर यांच्याकडे ही जबाबदारी राजस्थान सरकारने सोपविली आहे.
पुजाऱ्याच्या दरमाह वेतनासह दिवाबत्ती आणि भोगराज नैवेद्यमकरिता स्वतंत्र अनुदान राजस्थान सरकारकडून आॅनलाइन बँक खात्यात जमा केले जाते. दरमहा १८०० रुपये वेतन आणि १५०० रुपये भोगराग नैवेद्यम सामग्रीचे बिल दरमहा नियुक्त पुजाºयाला देवस्थान विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सादर करावे लागतात. दरम्यान, सदर बिल जीएसटीसह नसल्यामुळे ते थांबविण्यात आले आहे. यात मागील १४ महिन्यांचे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे. ते त्वरित मिळण्यासाठी स्थानिक पुजाºयाने राजस्थान सरकारशी पत्रव्यवहार केल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली.
महाराजा मानसिंह
अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक मुघल सेनापती आमनेर-जयपूर संस्थानचे प्रसिद्ध राजा मानसिंह प्रथम याचा मृत्यू अचलपूरमध्ये झाला. या महाराजा मानसिंह प्रथमच्या स्मृतीप्रीत्यर्थ व सन्मानार्थ एक स्मारक (सेनोटॅफ) याच परिसरात १६१२ मध्ये बांधण्यात आले आहे. या स्मारकाची दुरुस्ती महाराजा सवाई मानसिंह द्वितीयच्या आदेशावरून १९३५ मध्ये केली गेली. राजा मानसिंह प्रथम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेल्या दगडी चबुतºयावर एक छोटी मंदिररूपी घुमटी आहे. त्यात महादेवाची पिंड आहे. हीच ‘राजा की छत्री’. या ठिकाणच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यमचे अनुदान हनुमानजींच्या अनुदानासोबत राजस्थान सरकारकडून पाठविले जाते. या ठिकाणाची जबाबदारीही हनुमान मंदिरावर नियुक्त पुजाऱ्याकडेच राजस्थान सरकारने सोपविली आहे.
राजा जयसिंह
महाराजा मानसिंहचे वंशज राजा जयसिंह यांचा या हनुमान मंदिराशी संबंध असून त्यांच्याच नावाने अचलपूर शहरातील हा जयसिंह (जयसिंग) पुरा आहे. या मंदिर परिसरालगत राजस्थान सरकारच्या मालकीची नझूलची ९० हजार चौरस फूट जागा आहे. या ठिकाणी राजस्थान सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही काहीही करता येत नाही. राजस्थान सरकारच्या प्रॉपर्टी अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी आजही या क्षेत्राला भेटी देऊन त्याची पाहणी करतात.