२० हजारांसाठी गेली आयुष्यातून ‘खुशी’
By admin | Published: January 13, 2016 12:06 AM2016-01-13T00:06:32+5:302016-01-13T00:06:32+5:30
‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशी मराठीत एक म्हण आहे. पोलीस खात्यात काँस्टेबलची नोेकरी करीत असताना काही कारणान्वये ‘त्याचे’निलंबन झाले.
अमरावती : ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशी मराठीत एक म्हण आहे. पोलीस खात्यात काँस्टेबलची नोेकरी करीत असताना काही कारणान्वये ‘त्याचे’निलंबन झाले. वेतन कपात सुरू झाली. त्याचदरम्यान अवघ्या पाच वर्षांची चिमुरडी आजारी पडली. आजार गंभीर होेता. उपचारासाठी पैसा नव्हता. त्यामुळे पोलीस कल्याण निधीतून २० हजार रूपयांची मदत मिळण्यासाठी अर्ज केला. तोे नामंजूर झाला आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने घराचे चैतन्य असलेली खुशी जग सोडून गेली.
पोलिसांनी दाखविला निष्ठूरपणा
अमरावती : जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि मानवाधिकारांच्या जपणुकीचा दावा करणाऱ्या पोलीस खात्याची त्यांच्याच कर्मचाऱ्याबद्दलची ही जीवघेणी अनास्था म्हणूनच अधिक संतापजनक आहे.
पोलिसांच्या सहृदयतेअभावी आर्थिक मदत न मिळाल्यानेच माझी चिमुकली नात अकाली मरण पावली. त्यामुळे या प्रकरणातील दोषींची चौकशी करून त्यांच्यावर कठोेर कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून मृत खुशीची आजी आणि निलंबित काँस्टेबल रूपचंद चंदेलेची वृध्द आई लीलाबार्इंनी केली. घडलेला एकूणच प्रकार अंगाचा थरकाप उडविणारा आहे. याबाबत घटनाक्रम जाणून घेतला असता मृत खुशीच्या पित्याच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. अवघ्या २० हजारांसाठी आपण खुशीला गमावले, हा अपराधबोध त्यांना छळतोय तर दुसरीकडे पोेलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जराशीही सहृदयता दाखविली असती तर आज खुशीला गमावण्याची वेळ आली नसती, हे शल्य त्यांना बोचते आहे.
बडनेरा पोेलीस ठाण्यात कार्यरत पोेलीस काँस्टेबल रूपचंद चंदेलेला वरिष्ठांच्या आदेशानुसार काही कारणान्वये १० आॅगस्ट रोजी निलंबित करण्यात आले. राजापेठ परिसरातील पोलीस क्वॉर्टरमध्ये त्याचे कुटुंब वास्तव्यास आहे. पत्नी दोेन लहान मुली आणि आई असा त्याचा परिवार. निलंबन झाल्याने रूपचंद चंदलेला अवघे ३ हजार रूपये वेतन मिळते. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली आहे. याच दरम्यान २९ नोव्हेंबर रोजी त्याची साडेपाच वर्षांची मुलगी खुशी अकस्मात आजारी पडली. तिला निमोनिया झाला. स्थानिक होप हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू झाले. तिच्या उपचाराकरिता अंदाजे ३० ते ३५ हजार रूपये खर्च अपेक्षित होता. त्यामुळे रूपचंद चंदेले याने पोलीस कल्याण निधीतून २० हजार रूपये तातडीने मिळावेत अशी मागणी १ डिसेंबर रोजी केली. तसेच त्याने जीपीएफमधून एक लाख रूपये कर्जाची मागणीही केली होती. मात्र, पोलीस कल्याण निधीतून रक्कम मिळण्याची मागणी अमान्य करण्यात आली.
दरम्यान, पुढील उपचारासाठी तिला नागपूरच्या आॅरेंजसिटी हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, तोवर तिची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. २५ डिसेंबरला तिचा अखेर मृत्यू झाला. अमरावतीतच योग्य उपचार मिळाल्यानंतर तिला नागपूरला हलविले असते तर तिचा जीव वाचला असता असे चंदेले कुटुंबाचे म्हणणे आहे. याबाबत खुशीच्या आजीने पोलीस आयुक्तांच्या नावे तक्रार दाखल केली असून न्यायाची मागणी केली आहे.
खुशीला 'सिस्टिक फायब्रॉसिस'सदृश आजार होता. या आजारात फुफ्फुसात सातत्याने संक्रमण होते. त्यावरील उपचार अत्यंत कठीण आहेत. विशिष्ट इस्पितळातच 'एन्झाईम थेरपी'द्वारे उपचार होऊ शकतो. 'होप हॉस्पिटल'ने अमरावतीत शक्य ते सर्व इलाज केलेत. नागपूरला हलविताना आम्ही बिलदेखील मागितले नाही. खुशीच्या वडिलांनी नंतर स्वत:हून बिल अदा केले.
डॉ.अद्वैत पानट, होप हॉस्पिटल.
माणुसकीतूनही करता आली असती मदत!
रूपचंदवर जरी निलंबनाची कारवाई झाली होती तरी तो पोलीस खात्यातील कर्मचारी होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटात कर्मचाऱ्यांसाठीचाच पैसा तातडीने उपलब्ध करून देण्याची माणुसकीही पोलिसांनी दाखविली नाही. पोलीस कल्याण निधीतून पैसा उपलब्ध करून देण्यात तांत्रिक अडचणी असतील तर अवघ्या २० हजारांची मदत खासगीरित्याही पोेलीस अधिकारी करू शकले असते. पैशांसाठी रूपचंद यांनी उपायुक्तांसह अनेक वरिष्ठांचे उंबरठे झिजविले. मात्र, कोणालाच पाझर फुटला नाही.
ही तर अमानुषताच : निलंबित कॉन्स्टेबलच्या चिमुरडीचा काय होता दोष ?
खुशीचा पिता रूपचंद चंदेले कदाचित दोषी असेल तर चौकशीनंतर त्यांना काय द्यायची ती शिक्षा दिली जाईलच; पण त्यात खुशीचा काय दोष? पोलीस अधिकाऱ्यांना रूपचंदच्या अर्जावर संशय आला असेल तर त्यांनी खुशीच्या आजारपणाबद्दल इस्पितळात जाऊन शहानिशा करायला हवी होती. कदाचित त्यामुळे खुशीचे प्राण वाचले असते. परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी संवेदनशून्यतेची परिसीमा गाठली आणि एका कुटुंबातील 'खुशी' कायमची हिरावली गेली.