घरी रीघ शुभेच्छांची, खासदारांना चिंता दुष्काळाची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:13 AM2019-05-25T01:13:10+5:302019-05-25T01:14:20+5:30
नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या यशाचे शिल्पकार आमदार रवि राणा यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ त्यांच्या घरी लागलेली असताना, दोघांनाही चिंता मात्र दुष्काळग्रस्त, आगग्रस्त, पाणी नि वैरण टंचाईग्रस्तांची लागली आहे.
गणेश देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या यशाचे शिल्पकार आमदार रवि राणा यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ त्यांच्या घरी लागलेली असताना, दोघांनाही चिंता मात्र दुष्काळग्रस्त, आगग्रस्त, पाणी नि वैरण टंचाईग्रस्तांची लागली आहे.
गुरुवारी उशिरा रात्री विजयी घोषित झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी नवनिर्वाचित खासदारांनी दुष्काळाच्या मुद्यावर जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून निर्देशही दिलेत.
निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काही गावांमध्ये आग लागल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. हातावर आणून पानावर खाणाºयांना तर जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला.
धारणी तालुक्यातील भुलोरी या गावात आगीने जे तांडव केले, ते 'पंचमहाभूतां'च्या शक्तीची जाणीव करून देणारे होते. आदिवासीबहुल भागातील सुमारे ५० घरे-गोठ्यांची अक्षरश: राख झाली. भुलोरीतील गावकरी मंगलकार्यासाठी नजीकच्या गावात गेले असताना, ती घटना घडल्यामुळे बचावाचीही संधी मिळू शकली नाही. गोठ्यात बांधलेली जनावरे जागीच कोळसा झाली.
वलगावातील २१ घरेही अशीच आगीत बेचिराख झाली. लोक उघड्यावर आलेत. खासदार नवनीत राणा यांनी आगग्रस्तांच्या उपाययोजनांसंबंधाने प्रशासनाकडून माहिती घेतली. तेथील भेटीचेही नियोजन त्यांनी आखले आहे.
नियोजनास आरंभ
ऐतिहासिक विजय मिळवून सर्वाधिक कमी वयाच्या पहिल्या महिला खासदार असा बहुमान प्राप्त करून १२ तासही उलटले न उलटले तोच नवनीत रवि राणा यांनी जिल्हावासी होरपळत असलेल्या दुष्काळाच्या आणि पाणी-वैरणटंचाईच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले.
शुभेच्छा देण्यासाठी घरापर्यंत येणाºयांना सामोरे जाणे हे कर्तव्य असल्याच्या भावनेतून राणा दाम्पत्याने शुक्रवारी दिवसभर शुभेच्छांचा स्वीकार केला. सकाळपासून सुरू झालेला लोकप्रवाह रात्रीपर्यंत ओसंडून वाहत होता. आनंदोत्सवात शुभेच्छांचा स्वीकार करणाºया या आमदार-खासदार जोडप्याच्या डोक्यात दुष्काळ निवारणाचाही मुद्दा फिरत होता. निकालाच्या रात्रीच उशिरा त्यासंबंधी त्यांनी नियोजन आखले.
काय केले जावे, काय करणे शक्य आहे, यासाठी जिल्हाधिकारी शैलश नवाल यांच्याशी शुक्रवारी सकाळी दूरध्वनीहून चर्चा केली. सामान्यजनांना काय मदत करता येईल या अनुषंगाने सूचना केल्या, निर्देश दिले. याच मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच बैठक घेण्याचीही सूचना खासदारांनी जिल्हाधिकारी नवाल यांना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खासदारांसाठीचे शासकीय कार्यालय लगेच कार्यान्वित करण्याची सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाºयांना शुक्रवारी सकाळी केली. प्रशासकीय स्तरावरून त्याची अंमलबजावणी केली गेली. खासदारांनी त्या कार्यालयाची जबाबदारीही त्यांच्या स्टाफला नेमून दिली.