आनंद वार्ता! अमरावती जिल्ह्यात मान्सूनची एंट्री; दमदार पावसाची प्रतीक्षा, २४ तासांत सरासरी ११ मिमी पावसाची नोंद
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 12, 2024 09:08 PM2024-06-12T21:08:03+5:302024-06-12T21:08:14+5:30
जिल्ह्यात यंदा चार दिवसपूर्व मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. १५ ते १६ जूनदरम्यान मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता ‘आयएमडी’द्वारा यापूर्वी वर्तविण्यात आली होती.
अमरावती : जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाची शुभवार्ता भारतीय हवामान विभागाने बुधवारी दुपारी दिली. मंगळवारी सार्वत्रिक स्वरूपात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला व दोन दिवस पावसाचे राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले केले आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. ८० ते १०० मि.मी. पाऊस होईतोवर पेरणी नको, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात यंदा चार दिवसपूर्व मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. १५ ते १६ जूनदरम्यान मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता ‘आयएमडी’द्वारा यापूर्वी वर्तविण्यात आली होती. अलीकडच्या काळात मान्सूनच्या आगमनात विविधता दिसून आलेली आहे. १५ जूननंतरच मान्सूनचे आगमन झालेले आहे. यंदा मात्र लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
१ ते १२ जूनदरम्यान सरासरी ५९ मिमी पाऊस व्हायला पाहिजे, प्रत्यक्षात ५१.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही ८६.६ टक्केवारी आहे. गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यात फक्त ८ मि.मी. पाऊस झाला होता. २४ तासांत जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाला असला तरी चांदूरबाजार, अचलपूर, मोर्शी, वरूड व चिखलदरा तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे.
बियाणे बाजारात वाढली वर्दळ
पहिल्या सार्वत्रिक पावसानंतर कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकरी गर्दी करत आहे. फसवणूक होऊ नये यासाठी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी व पक्की पावती घ्यावी. बियाण्याची पिशवी, पाकीट, टॅग सांभाळून ठेवण्याचे आवाहन एसएओ राहुल सातपुते यांनी केले आहे.