मद्यपींचा हरपला तोरा, मदिरेसाठी लाचार

By admin | Published: April 13, 2017 12:03 AM2017-04-13T00:03:33+5:302017-04-13T00:03:33+5:30

मदिरा प्राशन केली की अंगात नवा जोश संचारतो. धाडस निर्माण होते. एकूण काय तर दारू पोटात गेली की ‘चुहा भी शेर बन जाता है’ असे म्हणतात.

Harassment of alcoholism | मद्यपींचा हरपला तोरा, मदिरेसाठी लाचार

मद्यपींचा हरपला तोरा, मदिरेसाठी लाचार

Next

वैभव बाबरेकर /अमरावती
मदिरा प्राशन केली की अंगात नवा जोश संचारतो. धाडस निर्माण होते. एकूण काय तर दारू पोटात गेली की ‘चुहा भी शेर बन जाता है’ असे म्हणतात. मद्याचा अंमल चढू लागला की मद्यपींना वेगळाच तोरा येतो. मात्र, शासनाच्या दारूबंदीच्या निर्णयानंतर दारू मिळणे दुरापास्त झाल्यो आता मदिरालयात ऐटीत बसून मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींचा तोरा पुरता हरपल्याचे चित्र आहे. हे दारूडे दारूसाठी पुरते लाचार झाले असून ‘दारूसाठी काही पण..’ अशी वेळ त्यांच्यावर आली आहे.
हायवेवरील ५०० मीटर अंतरावरील बहुतांश दारू दुकाने बंद झाल्याचा हा परिणाम आहे. आता मद्यपींना दारु दुकांनासमोर रांगेत उभे राहावे लागत आहे. एरवी मोठ्या ऐटीत टेबलवर बसून हव्या त्या ‘ब्रांड’ची आॅर्डर देणाऱ्या मदिराप्रेमींना आता दारु मिळविण्यासाठी महत्प्रयास करावे लागत आहे. बोटावर मोजण्या इतक्या दारू दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असल्याने मद्यपींना दारूचे पेले देखील स्वत:च्या हाताने विसळून स्वयंसेवा द्यावी लागत आहे. मद्यपी दारूसाठी अक्षरश: लाचार झाले आहेत.
जिल्ह्यात केवळ १२६ मद्यविक्रीची दुकाने सुरु आहेत. त्यातुलनेत ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने मद्यपींची प्रचंड तारांबळ उडाली आहे. वाट्टेल ते करून दारू मिळविण्यासाठी मदिराप्रेमी जीवाचे रान करीत आहेत. जिल्ह्यातील लाखो मद्यपी दारूबंदीचा हा फटका सहन करीत सैरभैर झाले आहेत.
गरीब, श्रीमंत एकाच रांगेत
अमरावती : मद्यपींचा तोरा आता हरवल्याचे दिसून येत आहे. गरिबांची देशी आणि श्रीमंताची विदेशी हा भेदभावच मिटल्याचे सध्याचे चित्र आहे. देशी दारुच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने गरीब-श्रीमंत सगळे एकाच रांगेत उभे असल्याचे दिसून येते. पूर्वीसारखे मद्यप्राशन आता सुखावह राहिले नसून कशीबशी दारू मिळवून ती गटागटा रिचवण्याची वेळ दारूड्यांवर आली आहे. विदेशी दारु पिणाऱ्यांचेही तेच हाल होत असल्याचे दिसून येत आहे. ‘बार अ‍ॅन्ड रेस्टॉरेंट’मध्ये मद्य पिणाऱ्यांना सुद्धा आता शांततेत दारु पिणे कठीण झाले आहे.
बंदीपूर्वी यथेच्छ मद्यप्राशनानंतर पैसे दिले तरी चालत असत. आता मात्र आधी पैसे आणि नंतर दारू अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता निवांत ठिकाणी बसून दारू पिणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई होते. या भीतीने मद्यपींच्या गळ्यातून दारु सुद्धा उतरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे मद्यपी पूर्णत: लाचार झाले आहेत.

दारू टंचाईमुळे घडताहेत रंजक किस्से, मद्यपींची गत केविलवाणी
ग्राहकांची गर्दी लक्षात घेता रूख्मिणीनगरातील एका बारमधील खुर्च्या काढून केवळ टेबल ठेवण्यात आले आहेत. काऊंटरवरून मद्य व स्नॅक्स खरेदी करून टेबलभोवताल उभे राहून दारू प्यावी लागते. मद्यप्राशन आटोपल्यानंतर ग्लासही ग्राहकांना स्वत:च विसळावे लागतात.
विविध बारमध्ये एकाच टेबलवर दोन अनोळखी ग्राहक बसून मद्यप्राशन करीत आहेत. एकाच स्नॅक्सवर दोघेही ताव मारीत आहेत. मद्यपींमधील हा अनोखा एकोपा पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.
कॅम्प रोडस्थित एका बारमध्ये प्रचंड गर्दी असल्याने नव्याने आलेल्या मद्यपींना बसायला जागा मिळत नाही. अशावेळी एखाद्या टेबलवर आधीपासून बसलेल्या ग्राहकांना विनवणी करून त्याच टेबलवर बसून चक्क दोन गट मद्यप्राशन करतानाचे चित्र दिसून येत आहे. एकच पाण्याची बाटली व स्नॅक्सवर वाटून खाणारे मद्यपी खरोखरीच लाचार झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
एरवी सायंकाळी नोकरदारवर्गाची दारू दुकानांमध्ये गर्दी होत होती.मात्र, आता प्रचंड गर्दीत दारू पिणे शक्य नसल्याने नोकरदार दुपारीच दारू खरेदी करून ठेवत आहेत. रात्री आरामात बसून मद्यप्राशन करता यावे, यासाठी नोकरदारांनी ही क्लृप्ती लढविल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. अवैध मद्यविक्रीला उधाण
दारुबंदीमुळे अवैध मद्यविक्रीला उधाण आले आहे. गावठी, देशी व विदेशी दारुची सुद्धा अवैध विक्री जिल्ह्यात सुरु झाली आहे. शहरातील काही ‘बार अ‍ॅन्ड रेस्टॉरेंट’मध्ये पूर्वी सहजरित्या दारु मिळायची. मात्र, त्याठिकाणी आता छुप्या मार्गाने मद्यविक्री सुरु झाल्याने प्रत्येकाला सहजरित्या दारु मिळणे अवघड झाले आहे.

स्वयंसेवा
एरवी दारूच्या नशेत वाद, भांडणास करण्यास एका पायावर तयार असणारे मद्यपी आता चांगलेच नरमले आहेत. पूर्वी टेबलवर बसून मद्याचा एक-एक घोट घेत गप्पा करणारे मद्यपी आता रांगेत लागून, धक्काबुक्की सहन करून दारू खरेदी करतात आणि उभ्यानेच रिचवतात. बारमध्ये तासन्तास बसणे तर दूर, दारु घ्या आणि चालते व्हा, आधी पैसे द्या आणि स्वत:च ग्लास विसळत आहेत.

Web Title: Harassment of alcoholism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.