विद्यापीठात ‘मार्इंड लॉजिक’ प्रबंधकाच्या कानशिलात हाणली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:04 PM2018-10-05T22:04:07+5:302018-10-05T22:04:33+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आ. रवि राणा द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात काही विद्यार्थ्यांनी शुक्रवार, ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांचे दालनात प्रवेश केला. मात्र, यावेळी दालनात हेमंत देशमुख नव्हते. अभिजित देशमुख यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आॅनलाइन निकालाची जबाबदारी असलेल्या माइंड लॉजिकचे प्रबंधक शैलेंद्र टंडन यांना बोलाविले. निकालात त्रुटी, विलंब आणि चुका होत असल्याबाबत त्यांना विचारणा केली. मात्र, माझे काम स्कॅनिंग करणे आहे. पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांची यादी परीक्षा नियंत्रकांकडे सोपविल्याची माहिती टंडन यांनी दिली. कार्यकर्त्यांनी टंडन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तरीही ते काहीही बोलत नव्हते. अखेर युवा स्वाभिमानचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांचा तोल सुटला आणि त्यांनी टंडन यांच्या कानशिलात जोरदार लगावली. त्यानंतर परीक्षा नियंत्रकाच्या दालनात एकच गोंधळ उडाला. यानंतर काहींनी टंडन यांना दालनाबाहेर नेले, हे विशेष.
यापूर्वी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एमसीए निकालात चुका झाल्याबाबत २५ सप्टेंबर रोजी विद्यापीठात आंदोलन केले होते.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ८६० विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही अपूर्ण आहे. गुरुवारी उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांची यादी दिली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा विद्यापीठात गेलो. मात्र, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक उपस्थित नव्हते. दरम्यान, माइंड लॉजिक एजन्सीच्या प्रबंधकांना याविषयी विचारणा केली असता, त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही.
- अभिजित देशमुख, उपाध्यक्ष, युवा स्वाभिमान
मी दालनात नसताना हा प्रकार घडला. माइंड लॉजिकच्या प्रबंधकांनी याबाबत रितसर तक्रार दिली आहे. हे प्रकरण पोलिसांत दिले जाईल. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची मागणी अवाजवी आहे. अभियांत्रिकी पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले असताना आता कॅरीआॅन देण्याची मागणी आहे. मात्र, ही मागणी तर्कसंगतच नाही.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.