मुलगी झाली ‘नकोशी’, कुलदीपकच हवा; ४ महिन्यांच्या चिमुकलीसह विवाहितेला घराबाहेर काढले
By प्रदीप भाकरे | Published: November 15, 2022 05:53 PM2022-11-15T17:53:27+5:302022-11-15T17:59:57+5:30
घटस्फोट दे, अन्यथा जाळून मारेन; सासरच्यांची धमकी
अमरावती : सासरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका विवाहितेचा अनन्वित छळ करण्यात आला. ५० हजार रुपये देऊनही दीड लाखांसाठी सासरी तिला धमकावण्यात आले. पुढे घटस्फोट दे, अन्यथा जाळून मारेन, अशी गर्भित धमकीदेखील देण्यात आली. ती छळमालिका तेवढ्यावरच थांबली नाही. तर, तिने मुलीला जन्म दिल्याने मुलगी नको, आम्हाला घराचा कुलदीपकच हवा, असे बजावत तिला तिच्या नवजात मुलीसह घराबाहेर काढण्यात आले.
बडनेरा येथील नवी वस्ती भागातील शिवाजीनगर येथे १४ फेब्रुवारी २०२१ ते २३ मार्च २०२२ या कालावधीत तिचा छळ करण्यात आला. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आरोपी शेख फैजान शेख युसुफ (२७), शेख अहफाज शेट युसूफ (३५, दोन्ही रा. शिवाजीनगर, बडनेरा) व तीन महिलांविरुद्ध कौटुंबिक छळ, मारहाण, शिविगाळ व हुंडा प्रतिबंधक अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरिक्षक सोनाली मेश्राम यांनी ती तक्रार नोंदवून घेतली.
तक्रारीनुसार, लग्नाच्या काही दिवसानंतर विवाहितेला तिचा पती, भासरा व दोन महिलांनी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरवात केली. म्हणून तिच्या वडिलांनी आरोपींना ५० हजार रुपये दिले. काही दिवसानंतर उर्वरीत दीड लाख रुपये आण्ण्यासाठी पाचही आरोपी तिला शिवीगाळ, मारहान करायचे व तलाक देण्याची धमकी देत होते. तलाक दिला नाही तर जाळून मारण्याची धमकी देखील तिला देण्यात आली. म्हणून तिच्या वडिलांनी तिला १४ मे २०२१ रोजी माहेरी आणले. दरम्यान, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी तिला मुलगी झाली. ती बाब तिने पतीसह सासरला कळवली असता मुलगी झाल्यामुळे ते सर्व नाराज झाले. मुलगी सुखात राहावी, यासाठी तिच्या वडिलांनी जावई शेख फैजान याला पुन्हा ५० हजार रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी ती सासरी नांदण्यासाठी गेली.
पैसे आण, तेव्हाच घरी ये!
सासरी परतल्यानंतर ‘मुलगा पाहिजे होता, घरचा चिराग पाहिजे होता, मुलीलाच जन्म दिला, असे टोमणे मारत तिला पाचही आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली. माहेरहून उर्वरित एक लाख आणण्यासाठी, तिच्यावर दबाव आणण्यासाठी तिच्याकडील चांदीचे दागिने हिसकावून घेण्यात आले. १२ मार्च रोजी भांडण करुन पैसे आणशील तेव्हाच घरात ये असे म्हणून आरोपींनी तिला तिच्या लहानग्या मुलीसह घरातून हाकलून दिले. तेव्हापासून फिर्यादी महिला माहेरी राहत असून, अखेर तिने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.