बायकोकडून होतोय छळ; कोरोनाकाळात ५२ तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:39+5:302021-07-26T04:11:39+5:30
भरोसा सेेलमध्ये होते समुपदेशन : समेट घडून येईना अमरावती: सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा शारीरिक व मानसिक त्रास होण्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस ...
भरोसा सेेलमध्ये होते समुपदेशन : समेट घडून येईना
अमरावती: सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा शारीरिक व मानसिक त्रास होण्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत असली, तरी आता पुरुषांचादेखील कमी-अधिक प्रमाणात पत्नीकडून छळ होत असल्याचे दृष्टिपथास येत आहे. कोरोनाकाळात अमरावती शहर हद्दीतील तब्बल ५२ पत्नीपीडितांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नीविरोधात तक्रारी नोंदविल्या. पत्नीपीडितदेखील तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात, पुढे भरोसा सेलमध्ये धाव घेऊ लागल्याचे वास्तवस्पर्शी तेवढेच चिंताजनक चित्र आहे. कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने पतींना टोमणे मारले जातात. त्यातून वारंवार छळ केला जात असल्याचा अनेक तक्रारींचा सूर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरोना काळात तक्रारी वाढल्या
कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी बायकोविषयी तक्रारी होत्या. मात्र, त्या घराच्या चार भिंतीच्या आत राहायच्या. पण कोरोना सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम हा नोकरी, पर्यायाने आर्थिक स्थितीवर झाल्याने पतीच्या छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली.
आर्थिक टंचाई आणि अतिसहवास
कोरोना काळ सुरू झाल्यानंतर अनेकांच्या लहान मोठ्या नोक-या गेल्या. स्वयंरोजगारदेखील बंद पडला. त्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक विपन्नावस्थेपर्यंत पोहोचली. हातातून नोकरी गेल्याने संसारातील धुसफुस चव्हाट्यावर आली.
२) कोरोनाकाळात एकीकडे नोकरी, रोजगार गेला. तर कडक लॉकडाऊनमुळे सर्वाधिक काळ पत्नी, कुटुंबीयांसोबत गेला. तो अधिक सहवासदेखील काही दाम्पत्यांमध्ये धुसफुस व अंतर्गत कलह वाढविणारा ठरला.
पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?
बायको छळ करते, टोमणे मारते, अशी तक्रार घेऊन गेल्यास वेगळ्याच नजरेने पाहतात. तक्रार नोंदवून घेण्याचा आग्रह धरल्यास आधी समुपदेशनच केले जाते. पत्नीविरोधातील तक्रारी पुढे न्यायालयीन पातळीवर टिकू शकणार नाही, असा सल्लाही दिला जातो. पुरुषांच्या हक्कासाठी लढणार तरी कोण?
एक पत्नी पीडित
बायकोकडून छळ होत असल्याची तक्रारी
२०२० : ४५
२०२१ : ७