हार्डकोअर चेनस्नॅचर्स जेरबंद, हेल्मेट, चाकूही गवसला, सोने घेणारे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 05:00 AM2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:00:57+5:30
गाडगेनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व डीबीचे पथक मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पॅराडाईज कॉलनीत गस्त घालत होते. त्यावेळी मो. समीर या पोलिसाचे दुचाकीवरील दोघांकडे लक्ष गेले. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याच्या गळ्यात केशरी पिवळा दुपट्टा होता. ते चेनस्नॅचर असल्याची खात्री पटताच मो. समीर यांनी त्यातील एकावर झडप घातली. हाती आलेल्याची ओळख जगजितसिंह टांक (२९, रा. नांदगाव पेठ) अशी पटविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वर्षभरापासून शहरात धुडगूस घालणाऱ्या मंगळसूत्र चोरांच्या दुकलीला पकडण्यात गाडगेनगर पोलिसांना मंगळवारी सायंकाळी यश आले. यंदाच्या चेनस्नॅचिंगच्या तब्बल ११ घटनांची कबुली त्या चोरजोडीने दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हेल्मेट व चाकू जप्त करण्यात आला. सोन्याच्या रिकव्हरीसाठी एक पथक स्थानिक सराफा बाजारात तळ ठोकून आहे. यात अन्य तिघांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
गाडगेनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व डीबीचे पथक मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पॅराडाईज कॉलनीत गस्त घालत होते. त्यावेळी मो. समीर या पोलिसाचे दुचाकीवरील दोघांकडे लक्ष गेले. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याच्या गळ्यात केशरी पिवळा दुपट्टा होता. ते चेनस्नॅचर असल्याची खात्री पटताच मो. समीर यांनी त्यातील एकावर झडप घातली. हाती आलेल्याची ओळख जगजितसिंह टांक (२९, रा. नांदगाव पेठ) अशी पटविण्यात आली. विकेश रावसाहेब खंडारे (२४, सरस्वतीनगर, नांदगाव पेठ) हा पसार झाला. जगजितसिंगला ताब्यात घेऊन गाडगेनगरला आणण्यात आले. तेथे डीसीपी मकानदार, एसीपी पूनम पाटील व पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्यापुढे उपस्थित केले. त्यानंतर जगजितसिंगने शहरातील ११ गुन्ह्यांची कबुली दिली. मंगळवारी उशिरा रात्री विकेशला नांदगाव पेठ येथून अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
गाडगेनगर पोलीस ब्रेव्हो!
आधी पाठलाग करायचा न् गळ्यात हात टाकून मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने पळ काढायचा. हा चेनस्नॅचर्सचा शिरस्ता. मात्र, अलीकडच्या दोन घटनांमध्ये चाकूचा धाक दाखवून चेनस्नॅचिंग झाली. दोन्ही घटना मॉर्निंग वॉक करताना घडल्या. त्यामुळे महिला प्रचंड धास्तावल्या होत्या. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांना काही काळ असंतोषाचा सामना करावा लागला. त्यावर मात करत गाडगेनगर पोलिसांनीच त्या चोराला पकडले. विशेष म्हणजे, त्याच्याकडून ११ गुन्ह्यांची कबुली घेण्यात यश मिळविले.
नंबर प्लेटला ओली माती
जगजितसिंगकडून एमएच २७ सीटी ४०१४ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली. चेनस्नॅचिंग करतेवळी तो दोन्ही नंबरप्लेटवर ओली माती लावायचा. मंगळवारीदेखील त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेट मातीने भरलेल्या होत्या.
अशी दिली गुन्ह्यांची कबुली
गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या सहा, फ्रेजरपुऱ्यात दोन व नांदगाव पेठ येथील तीन अशा एकूण ११ चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली जगजितसिंग प्यारासिंग टांक याने दिली आहे. ज्या दोन घटनांमध्ये चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्यात आले, त्यात विकेश खंडारे त्याच्यासोबत होता.
पोलीस आयुक्तांचे स्ट्राँग पोलिसिंग
यंदाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत चेनस्नॅचिंगच्या १४ घटनांची पोलीस दप्तरी नोंद झाली. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या कमालीच्या गंभीर झाल्या. अधिनस्थ यंत्रणेची त्यांनी कानउघाडणीदेखील केली. स्काॅड निर्माण केले. हिस्ट्रिशिटर तपासले. नाकाबंदी, गस्त वाढविली. घटनांचे अवलोकन करून सूक्ष्म निरीक्षण नोंदविले. त्याचा परिपाक म्हणून गाडगेनगर पोलिसांना चेनस्नॅचर्सच्या मुसक्या आवळण्यात यश आले. पोलीस उपायुक्त एम.एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील, प्रभारी ठाणेदार अनिल कुरळकर व ठाणेदार आसाराम चोरमले यांचादेखील त्यात सिंहाचा वाटा आहे.