अमरावती बाजार समितीत काँग्रेसचे हरीष मोरे सभापती
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 19, 2023 04:38 PM2023-05-19T16:38:08+5:302023-05-19T16:39:09+5:30
Amravati News अमरावती बाजार समितीच्या सभापतीपदी हरीष मोरे यांची तर भैय्यासाहेब निर्मळ यांची उपसभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली आहे.
गजानन मोहोड
अमरावती: वर्षभरात २० कोटींची उलाढाल व तब्बल दहा कोटींचा नफा मिळविणाऱ्या पश्चिम विदर्भात सर्वात श्रीमंत असणाऱ्या बाजार समितीचे कारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत आ. यशोमती ठाकूर यांचे निष्ठावान हरीष मोरे सभापती व शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रीती बंड गटाचे संचालक भैयासाहेब निर्मळ यांची उपसभापतीपदी अविरोध करण्यात आली. मोरे हे बाजार समितीचे २८ वे सभापती ठरले आहेत.
माजी पालकमंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात बाजार समितीमध्ये महाआघाडीने एकहाती सत्ता मिळविली असल्याने सभापतीपदावर त्यांचीच मोहर राहिली आहे. सभापती हरीष मोरे यापूर्वी तिवसा विधान युवक काँग्रेसचे अध्यक्ष नांदूरा (लष्करपूर) ग्रामपंचायतीचे उपसरपंच व तेथीलच सोसायटीचे अध्यक्ष होते.
बाजार समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाली. यामध्ये दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दुपारी १२.४६ ला पीठासीन अधिकारी स्वाती गुडघे यांनी दोन्ही पदांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर करताच सर्वांनी नवनिर्वाचीत सभापती व उपसभापतींचे सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आ, यशोमती ठाकूर, प्रिती बंड यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या एका संचालकाने नाराजी व्यक्त केल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. पिठासीन अधिकाऱ्यांना सतिश समर्थ, राहूल पुरी, गजानन वडेकर यांनी सहकार्य केले. याशिवाय प्रशासक महेंद्र चव्हाण व सचिव दिपक विजयकर व सर्व संचालक उपस्थित होते.