बहिरम यात्रेत आज जागेचा हर्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:11 AM2018-12-07T01:11:50+5:302018-12-07T01:14:12+5:30
विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षी १० ते ११ लाख रुपये महसूल मिळवून देणारी ही यात्रा जिल्हा परिषदेकरिता उत्पन्नाचे साधन बनली असली तरी नागरिकांकरिता मात्र जिल्हा परिषदेतर्फे कोणतीच सुविधा केली जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षी १० ते ११ लाख रुपये महसूल मिळवून देणारी ही यात्रा जिल्हा परिषदेकरिता उत्पन्नाचे साधन बनली असली तरी नागरिकांकरिता मात्र जिल्हा परिषदेतर्फे कोणतीच सुविधा केली जात नाही. दरम्यान, ७ डिसेंबरला यात्रेतील जागांचा हर्रास होणार आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर ही यात्रा १२७ हेक्टर क्षेत्रात भरत असते. यामध्ये दरवर्षी ६५० ते ६७५ निरनिराळी दुकाने थाटली जातात. या दुकानदारांकडून दरवर्षी प्रशासनाला १० ते ११ लाख रुपये उत्पन्न होते, तर या यात्रेवर प्रशासनाकडून केवळ दोन ते तीन लाख रुपयेच खर्च केले जातात. या आलेल्या उत्पनामधून ५० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा होते व उर्वरित ५० टक्के रक्कम कारंजा बहिरम ग्रामपंचायतीला जमा होतो. संपूर्ण यात्रेच्या देखरेखीची व सुविधा पुरविण्याची जबाबदारी चांदूर बाजार पंचायत समितीवर राहते. मात्र, यात्रेत सुविधा पुरविण्यावर आवश्यक खर्च केला जात नसल्याने यात्रेकरूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
जिल्ह्यातील सर्वात जास्त वेळ राहणारी आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत विविध समुदायांचा मिलाप होत असतो. त्यांच्या सुविधेला प्राधान्य दिल्यास महसूल वाढीस लागेल. त्यामुळे सर्व स्तरांतील लोकप्रतिनिधींनी आपसी मतभेद विसरून जिल्ह्याचे वैभव असणाऱ्या बहिरम यात्रेच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी रास्त मागणी बहिरामबाबा भक्तांनी केली आहे.
नवसाला पावणारा बहिरमबाबा
बहिराम यात्रा सातपुड्याच्या पायथ्याशी भरत असल्याने या भागात राहणारे आदिवासी बांधवांचे यात्रेत मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू असते. बहिरमबाबा हे अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत असून, आपल्या कुलदैवताचे नवस फेडण्याकरिता हजारो भाविक यात्रेत दर्शनाला येतात. त्यामुळे नवसाला पावणारा बहिरमबाबा अशी या दैवताची ओळख आहे.
रोजगाराचे साधन
यात्रेतील दुकानांकरिता जागेचा लिलाव स्थानिक पंचायत समितीतर्फे ७ डिसेंबरला केला जाणार आहे. यात्रेत ग्रामीण भागातील कलाकुसरीचे साहित्य विक्रीकरिता येत असतात. त्यामुळे ही यात्रा अनेकांच्या रोजगाराचे साधन बनली आहे. दरवर्षी पंचायत समितीतर्फे या यात्रेतील दुकानांच्या जागेचा लिलाव घेण्याकरिता नागरिकांची गर्दी होते.
या सुविधांची मागणी
राहुट्या टाकून यात्रेत अनेक दिवस मुक्काम केला जात असल्याने आवश्यक सुविधांची मागणी होते. भाविकांसाठी आवश्यक त्या प्रमाणात स्वछतागृह नसून, महिला वर्गाला कुचंबणा सहन करावी लागते. यात्रेकरूंना आवश्यक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय या यात्रेदरम्यान दिसून येत नाही.