हर्ष पोद्दार यांचे कोविड व्यवस्थापन कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:24+5:302021-07-11T04:10:24+5:30
बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनमधील नियोजन, १ लाख ६० हजार परतले ‘विथ नो कॅज्युअल्टी’ धीरेंद्र चाकोलकर अमरावती : तत्कालीन बीड जिल्हा ...
बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनमधील नियोजन, १ लाख ६० हजार परतले ‘विथ नो कॅज्युअल्टी’
धीरेंद्र चाकोलकर
अमरावती : तत्कालीन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक तथा राज्य राखीव पोलीस दलाचे अमरावती येथील समादेशक हर्ष पोद्दार यांनी कोरोनाकाळात केलेले पोलिसिंग जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क स्थित कोलंबिया स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्सच्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा विषय झाला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये ते बीड जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे ७० हजार ऊसतोड कामगार जीवितहानीविना कुटुंबांमध्ये परतले.
एकूण १ लाख ६० हजार कामगारांची ‘घरवापसी’ झाली. याशिवाय ३१ मे रोजी पहिला लॉकडाऊन अधिकृतरीत्या संपेपर्यंत एकही कोरोना संक्रमिताची जिल्ह्यात नोंद नव्हती.
बीड जिल्ह्यातून आजूबाजूच्या साखरपट्ट्यात तसेच उत्तर कर्नाटकमध्ये गेलेले ७० हजार ऊसतोड कामगार एप्रिल-मे २०२० मध्ये लॉकडाऊनच्या परिणामी परतले. तोपर्यंत सीमेवरील पुणे व औरंगाबाद हे जिल्हे कोरोना हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे या मजुरांकरवी कोरोना संसर्ग पसरू नये, याकरिता सहा जिल्ह्यांना भिडणाऱ्या सीमांवर ३०० हून अधिक आंतरजिल्हा रस्ते हुडकून सील करण्यात आले. कोरोना चाचणीपश्चात १९ तपासणी नाक्यांवरूनच या मजुरांना जिल्ह्यात परत घेण्यात आले. जिल्हा पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूम उभारून हे कार्य संचालित करण्यात आले. याशिवाय सरपंच, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी चाचणीविना गावात दाखल झालेल्या व्यक्तींबाबत कळविण्याचे चोख कार्य केले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेलमार्फत ३५० जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कुटुंबांसाठी क्यूआर कोड युक्त पास तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलिसांच्या चमू व ७० हजार ‘चोवीस तास’ सेवा पुरवठादार तयार करण्यात आले. जिल्ह्यात तीन हजार ई-पासचे वितरण करण्यात आले. अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसाठी अर्ज केल्याच्या अर्ध्या तासात त्या पुरविण्यात आल्या.
--------
लढा कोरोनाशी जनजागरणाने
समुदाय केंद्रित उपायांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात आली. पंडित, मुल्ला-मौलवी, धम्मगुरू यांच्याकरवी छोटेखानी व्हिडीओ तयार करून कोरोनाशी मुकाबल्यासाठी काय करावे नि करू नये, याबाबत माहिती देण्यात आली. परिणामी सण-उत्सवात कुठेही नागरिकांची गर्दी दृष्टीस पडली नाही.
------------
घरांचे जिओ फेन्सिंग
वस्ती, वाड्यांमध्ये विखुरलेल्या घरांमधील होम क्वारंटाईन लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘लाईफ ३६०’ हा जीपीएस ॲप तयार करून तो व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे होम क्वारंटाईनच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य झाले. याशिवाय बीट जमादार, पोलीस पाटील व ग्राम रोजगार सेवक यांना व्यक्तिश: घरोघरी तपासणीसाठी पाठविण्यात आले.