हर्षेंची ‘राजकीय’ घुसखोरी प्रशासनावर वरचढ !
By admin | Published: April 22, 2017 12:23 AM2017-04-22T00:23:01+5:302017-04-22T00:23:01+5:30
महापालिकेत अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लागावी, यासाठी जोरकस प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांच्या
‘जीएडी’ला जुमानेनात : झोन सभापतींच्या पदग्रहण सोहळ्यात सहभागी
अमरावती : महापालिकेत अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लागावी, यासाठी जोरकस प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांच्या भूमिकेला गजेंद्र हर्षे या कर्मचाऱ्याने हरताळ फासला आहे. जीएडीमध्ये कार्यरत असलेल्या हर्षेंनी राजरोसपणे राजकीय घुसखोरी चालविली असून त्यांना साधी शो-कॉज बजावण्याचे धाडसही प्रशासन करु शकले नाही.
आयुक्तांच्या ४ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशान्वये गजेंद्र हर्षे यांची मध्य झोन क्र. २ मधून सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर बदली करण्यात आली. शनिवारी बदली झाल्यावर लगतच्या सोमवारी त्यांच्या वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र प्रचाराकरिता महापालिका कर्मचाऱ्याला ‘फ्री हँड’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच ते परतले. निवडणूक रिंगणातील आप्तांच्या प्रचाराकरिता त्यांना रजा हवी होती. मात्र ती मिळू न शकल्याने ते ‘जीएडी’त रुजू झाले. त्यांच्या आप्त निवडणुकीत जिंकूनही आल्या व नगरसेविका बनल्या. त्यामुळे ते आता अधिकच रिलॅक्स झाले आहेत.
१७ एप्रिलला तर ते चक्क ‘सीएल’ टाकून राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांना विचारण्याचे धाडस जीएडीतील अधिकाऱ्यांकडून झाले नाही. लविना हर्षे या झोन सभापती म्हणून झोन २ चा पदभार स्वीकारत असताना गजेंद्र हर्षे पूर्णवेळ त्या राजकीय कार्यक्रमात होते. त्यांनी फोटोसेशनही करुन घेतले. वास्ताविक शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त व अपील नियम १९७९ नुसार आचारसंहिता पाळणे बंधनकारक आहे. ‘कॅज्युअल लिव्ह’ टाकूनही कर्मचारी राजकीय पदग्रहण वा अन्य कार्यक्रमात सहभागी होवू शकत नाही. हर्षे हे १७ एप्रिलला लविना हर्षे यांच्या बाजुला उभे राहून फोटोसेशन करुन घेत असताना प्रशासनाने ध्रुतराष्ट्राची भूमिका घेतली. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे धारिष्ट्य प्रशासन करु शकले नाही. (प्रतिनिधी)