सरत्या आयुष्याला हातोडा-छन्नीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:20 PM2018-08-10T22:20:26+5:302018-08-10T22:20:56+5:30
तीन दशके जनसामान्यांसमोर नाट्यकला सादर केल्यानंतर ८५ वर्षीय वृद्ध कलावंताला सरत्या आयुष्यात हातोडा-छन्नीचा आधार घ्यावा लागला. चक्की टकाई करून पोट भरण्याची पाळी या कलाकारावर आली आहे.
मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : तीन दशके जनसामान्यांसमोर नाट्यकला सादर केल्यानंतर ८५ वर्षीय वृद्ध कलावंताला सरत्या आयुष्यात हातोडा-छन्नीचा आधार घ्यावा लागला. चक्की टकाई करून पोट भरण्याची पाळी या कलाकारावर आली आहे.
तालुक्यातील तीन हजार लोकसंख्येचे विरुळ रोंघे छोटेसे गाव. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील; मात्र खरी ओळख लोककलेतील कलावंतांचे माहेरघर म्हणून. तथापि, सध्या उपेक्षित कलावंतांचे गाव म्हणून ही ओळख पुढे आली आहे. येथील वृद्ध कलावंत नामदेव गुल्हाने यांची कथा ही जगावेगळी आहे. सन १९५७ साली ‘रायगडची राणी’ या नाटकात नामदेव गुल्हाने यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर अनेक नाटकांत विविध पात्रांत ते दिसले.
आयुष्यभर नाटकातून प्रेक्षकांना हसविणाऱ्या गुल्हाने यांच्यावर वृद्धपकाळात दिवसभर चक्की टकाई करून आलेल्या पैशांतून पोट भरण्याची वेळ आली आहे. कधी शंभर, तर कधी दीडशे रुपयांत त्यांना गुजराण करावी लागत आहे.
'संसार हा सुखाचा'ने गाजविला महाराष्ट्र
नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे यासह मोठ्या शहरांत ‘पंताची सून’, ‘रायगडची राणी’, ‘सख्खे भाऊ - पक्के वैरी’, ‘पुढाºयांच्या गावगुडी तिढा’, ‘कन्या सासुराशी जाये’ असे तब्बल शंभरापेक्षा अधिक नाटक गतकाळात सादर केली आहेत. या गावातील महादेव बुटले, रामचंद्र गेडाम, भीमराव सावकार, भीमराव सावंत, गजानन किन्हिकर श्रीपाद गोमासे, नामदेव उगले या कलावंतांनी नावलौकिक केला.
कलावंताचे गाव
भारतीय कला संस्कृतीचा वारसा जोपासण्याचे काम विरूळ रोंघे या गावाने केले. मराठमोळे लोकनृत्य, लोकनाट्य, लोकसंगीत यातून समाजप्रबोधन करण्यात येथील कलावंत नेहमीच अग्रेसर आहेत. हे काम आता तरुण पिढीनेही हाती घेतले आहे.
आज डोळे साथ देतात म्हणून टकाई करू शकतो. हाताला हातोडा लागतो, पण पर्याय नाही. शासनाकडून मानधन मिळावे म्हणून अर्ज केले. मात्र, एक रुपयाचे मानधन मिळाले नाही.
- नामदेव गुल्हाने, नाट्यकलावंत, विरूळ रोंघे