बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचाणीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 09:24 PM2023-04-27T21:24:21+5:302023-04-27T21:24:48+5:30
Amravati News दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांना वन्यप्राण्यांची प्रगणनावजा दर्शन करता येणार आहे.
अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांना वन्यप्राण्यांची प्रगणनावजा दर्शन करता येणार आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी मचाणीवर थांबण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य असून, २८ एप्रिलपासून संकेतस्थळ सुरू होणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सहा वन्यजीव विभागात 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविला जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत ५ मे रोजी सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट, अकोला आणि पांढरकवडा या सहा वन्यजीव विभागात 'निसर्ग अनुभव'साठी बोर्डिंग पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. ऑनलाइन आरक्षणाकरिता १३२ मचाणींची संख्या आहे. व्हीव्हीआयपींसाठी २४ आरक्षित मचाणी निश्चित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी केवळ संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची बुकिंग ग्राह्य धरण्यात येणार नाही.
बोर्डिंग पॉइंटवर सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींचे आगमन झाल्यानंतर क्रमवार नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर क्रमवार नाेंदणीनुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे मचाणचे वाटप केले जाणार आहे. निसर्गप्रेमींकरिता ५ मे रोजीचे दुपारी आणि रात्रीचे जेवण, पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे. ६ मे रोजी सकाळी अल्पोपाहाराची व्यवस्था केली जाणार आहे. प्रगणना पूर्ण झाल्यानंतर निसर्ग अनुभव उपक्रमाचा अहवाल, समाविष्ट कर्मचारी, निसर्गप्रेमी यांच्या संख्यासह १५ मेपर्यंत कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.
वन्यजीव विभागनिहाय हे आहेत बोर्डिंगचे ठिकाण
गुगामल वन्यजीव : सेमाडोह, चिखलदरा, ढाकणा, तारूबांदा
अकोट वन्यजीव : सोमठाणा, धारगड, घटांग, गाविलगड
मेळघाट वन्यजीव : गाविलगड, जामली, अकोट, धुळघाट
अकोला वन्यजीव : वाघा, काटेपूर्णा, कारंजा, सोहोळ, बोथा, ज्ञानगंगा, लोणार
पांढरकवडा वन्यजीव : माथनी, टिपेश्वर, खरबी, कोरटा, बीटरगाव, सोनदाभी
निसर्गप्रेंमीसाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम ५ मे रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविला जाणार आहे. मचाणीहून वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाणार आहे. ऑनलाइन बुकिंगशिवाय ते शक्य होणार नाही.
- एम. एन. खैरनार, विभागीय वनाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प