तुम्हीही भरलंय का ऑनलाइन बिल?; पाच लाख ग्राहकांनी घेतली सवलत
By उज्वल भालेकर | Published: January 10, 2024 07:56 PM2024-01-10T19:56:19+5:302024-01-10T19:57:11+5:30
अमरावती परिमंडळात डिसेंबर महिन्यात ८२.७१ कोटींच्या देयकाचा भरणा
अमरावती : महावितरणच्या अमरावती परिमंडळातील वीज ग्राहक सवलतीत ऑनलाइन वीज बिल भरण्याला पसंती देत आहेत. डिसेंबर महिन्यात ८ लाख १८ हजार ग्राहकांपैकी ५ लाख २७ हजार २१९ ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीनेच ८२ कोटी ७१ लाख रुपयांचे वीज बिल भरले आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.
डिजिटल इंडिया इनिशिएटीव्हचा भाग म्हणून महावितरणच्या ग्राहकांना ऑनलाइन वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. सुविधेत ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के आणि जास्तीत जास्त ५०० रुपये सवलत देण्यात आली आहे. याशिवाय मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग विजय पचारे यांच्या पुढाकाराने महावितरणच्या सर्वच ग्राहकांनी ऑनलाइन वीज बिल भरावे यासाठी प्रयत्नदेखील करण्यात येत आहे. अमरावती परिमंडळात लघुदाब वर्गवारीतील ८ लाख १८ हजार ४९ ग्राहकांपैकी ६४ टक्के ग्राहक ऑनलाइन वीज बिल भरतात. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ३१६ ग्राहकांनी ५० कोटी ३० लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ९०३ ग्राहकांनी ३२ कोटी रुपयांचे वीज बिल हे ऑनलाइन भरले आहे; परंतु अजूनही वीज बिल भरणा केंद्रावर रांगेत उभे राहून वीज बिल भरणाऱ्या उर्वरित ३६ टक्के ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.