जिल्हाभरात कुबडेच्या सावकारीचे जाळे
By admin | Published: January 16, 2017 12:06 AM2017-01-16T00:06:26+5:302017-01-16T00:06:26+5:30
कुबडे ज्वेलर्सने उपनिबंधक कार्यालयास कर्जदार शेतकऱ्यांची यादी देण्यास विलंब केल्यामुळे शेकडो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.
तपास थंडबस्त्यात : पोलिसांनी करावी सखोल चौकशी
अमरावती : कुबडे ज्वेलर्सने उपनिबंधक कार्यालयास कर्जदार शेतकऱ्यांची यादी देण्यास विलंब केल्यामुळे शेकडो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. कुबडे यांच्या सावकारीचे जाळे जिल्ह्याभरात पसरले असून पोलिसांनी पूर्व इतिहास खणून काढल्यास सावकारी व्यवसायातील गुंतागुंतीच्या कारभाराचा भंडाफोड होऊ शकतो.
सावकारी व्यवसायात अग्रणी असणाऱ्या कुबडे ज्वेलर्सचे प्रमुख महादेव कुबडे यांनी ६२० कर्जदार शेतकऱ्यांची माहिती शासनाने दिलेल्या ‘डेडलाईन’नंतर उपनिबंधक कार्यालयास सादर केली. त्यामुळे हे शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. यादी सादर करण्यास विलंब केल्याने सहकारी संस्थेचे उपनिबंधक राजेंद्र तुकाराम पालेकर यांनी कुबडे ज्वेलर्सचे प्रमुख महादेव कुबडेविरूद्ध शहर कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली.
तक्रारीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे
अमरावती : त्यानुसार महादेव कुबडेविरूद्ध पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांची नोंद केली. सावकारीक्षेत्रात पाय रोवलेल्या कुबडेंचे जिल्ह्याभरात सावकारीचे मोठे जाळे पसरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून कर्ज घेतले आहे.
नजरचुकीने हा प्रकार घडला असून याप्रकाराची जबाबदारी घेण्याची तयारी कुबडे यांनी उपनिबंधकांसमक्ष दाखविली होती. हाप्रकार नजरचुकीने झाला असे समजले तर असे अनेक गैरप्रकार यापूर्वी सुद्धा नजरचुकीने झाले असल्याची शक्यता नाकारता येत आहे.
पोलिसांनी कुबडेंच्या कर्जासंबंधीच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केल्यास यातील बरेच गैरप्रकार बाहेर येण्याची शक्यता आहे. कुबडे ज्वेलर्सने सोने गहाण ठेऊन जर कोणाचा विश्वासघात केला असेल तर अशा त्रस्त शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी जनतेला कराव, असा सूर उमटू लागला आहे.
अटक करण्यात पोलिसांची कुचराई
१३ जानेवारी रोजी सहकारी संस्थेचे उपनिबंधक राजेंद्र तुकाराम पालेकर यांनी शहर कोतवाली पोलिसांकडे महादेव कुबडेविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस कुबडेंना अटक करून त्यांची चौकशी करणार होते. तशी ग्वाही पोलीस निरीक्षक विजय पाटकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र, अद्याप पोलिसांनी चौकशी आरंभली नसून कुबडेंना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकशी करण्यात पोलीस दिरंगाई का करीत आहेत, ही बाब पोलिसांच्या कर्तव्यावर संशय निर्माण करणारी ठरत आहे.
कुबडे पसार कसे ?
कुबडेंविरूद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यांना अटक करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनी हवी तशी तत्परता न दाखविल्याने कुबडे पसार झाले असावेत. पोलिसांनी अद्यापपर्यंत कुबडेचा शोध सुरु केला किंवा नाही, ही बाब सुद्धा गुलदस्त्यातच आहे.
आयकर केव्हा देणार लक्ष ?
कुबडे ज्वेलर्समधील प्रकाराच्या पार्श्वभूमिवर प्राप्तीकर विभागानेही त्यांची चौकशी करावी. काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने कुबडे ज्वेलर्सवर धाड टाकली होती. आता सावकारी व्यवहाराबाबत आयकर विभागाने चौकशी करावी.