पारंपरिक आठवडी बाजारातही ‘हॉकर्स झोन’
By admin | Published: February 21, 2017 12:06 AM2017-02-21T00:06:50+5:302017-02-21T00:06:50+5:30
रस्त्यावर वा रस्त्याच्या बाजूने व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी पारंपारिक आठवडी बाजारातही त्यांच्याकडील चिजवस्तू विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे.
नवी नियमावली : अटी-शर्तींचे पालन फेरीवाल्यांना अनिवार्य
अमरावती : रस्त्यावर वा रस्त्याच्या बाजूने व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी पारंपारिक आठवडी बाजारातही त्यांच्याकडील चिजवस्तू विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. तथापि त्यासाठी संबंधित फेरीवाल्यांना महापालिकेत घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करावे लागेल.
‘हॉकर्स झोन’साठी आठवडी बाजारांचे ठिकाण देखील विचारात घ्यावी आणि आठवड्यातील विशिष्ट दिवशी वा वेळी आणि स्थानिक प्राधिकरणाने लादलेल्या अटी-शर्र्तींना अधीन राहून रस्त्यावरील विक्रीसाठी त्यांना परवानगी देण्यात येईल, असे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने पथविक्रेता योजना २०१७ तयार केली असून त्यात फेरीवाल्यांचे संरक्षण, सर्वेक्षण, पात्रता निकष, विक्री प्रमाणपत्र, ओळखपत्र, मार्गदर्शक तत्वे, शुल्क, नूतनीकरण, परवान्याचे निलंबन, दंड, पथविक्री प्रमाणपत्राचे निलंबन, पथविक्रेत्यांना नवीन जागा देणे व त्यांचे निष्कासन करणे, विक्री प्रक्षेत्रे, खासगी ठिकाणांची विक्री प्रक्षेत्रे आदींबाबत उहापोह करण्यात आला आहे.
महापालिकेकडे जबाबदारी
अमरावती : रस्त्यांची रूंदी, वाहतुकीचे प्रमाण व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या, धारणक्षमता आणि रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वसाधारण जनतेची तसेच तेथील व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही, अशा मार्गाने हॉकर्स झोन आणि नो-हॉकर्स झोन निश्चित करण्याच्या सूचना महापालिकेला मिळाल्या आहेत. स्थानिक प्राधिकरण, फॅशन गल्ल्या, फळ, भाजीपाला, फुले, अन्न, मासे, कृषी उत्पन्न बाजार आदींच्या विशिष्ट प्रयोजनासाठी समर्पित विक्री क्षेत्रे, प्रक्षेत्रे नेमण्याचे अधिकार महापालिकेला आहेत.
जी व्यक्ती विक्री प्रमाणपत्राशिवाय किंवा अनधिकृत विक्री करीता असल्याचे आढळून येईल, अशा व्यक्तीला नोटीस दिल्यानंतर ताबडतोब निष्कासित करण्यात येईल. नगरविक्री समिती ९ जानेवारी १७ च्या पुढे सहा महिन्यांच्या कालावधीत विक्री प्रक्षेत्रे रस्त्यावरील विक्रीसाठी निर्बंधित विक्री प्रक्षेत्रे आणि ना-विक्री प्रक्षेत्रे निश्चित करेल आणि त्याचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्याच्या सूचना महापालिकेला मिळाल्या आहेत.
विक्री प्रमाणपत्राचे नूतनीकरण
विक्री प्रमाणपत्राचे दर पाच वर्षांनी नूतनीकरण करण्यात यावे. विक्री प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी शुुल्क प्रदान करण्याची एक सुलभ प्रक्रिया असेल.
स्थानिक प्राधिकरण, विक्री प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाच्या तारखा दोन महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या विक्रेत्यांची यादी तयार करील. सदर यादीत रक्कम व शुल्क भरण्याचे ठिकाण दर्शविण्यात येईल. विक्री प्रमाणपत्रावर पृष्ठांकन करून नूतनीकरण करण्यात येईल.
नूतनीकरणावेळी क्षेत्रासाठी, प्रक्षेत्रासाठी विहित महिन्याच्या शुल्काइतके नूतनीकरण शुल्क असेल. कोणत्याही दंडाशिवाय नूतनीकरण शुल्क भरण्यासाठी एक महिन्याचा सवलतीचा कालावधी देण्यात येईल. विलंब कालावधीसाठी १५ रूपये प्रतिदिन इतका दंड आकारण्यात येईल. विक्री प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाचे शुल्क प्रदान करण्यात कसुर केलेल्या पथविक्रेत्यांची यादी नगर पथविक्रेता समिती प्रसिद्ध करेल. विक्री प्रमाणपत्राचे नूतनीकरण एकावेळी पाच वर्षांसाठी असेल.
पथविक्रेता प्रमाणपत्र देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे
दिव्यांग, विधवा व एकल माता या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल.
सर्वेक्षणात निश्चित व नोंदणी केलेल्यांना नवीन प्रवेशार्थीपेक्षा पसंतीक्रम देण्यात येईल.
अर्जांची संख्या विक्री जागांच्या/ ठिकाणांच्या उपलब्ध संख्येपेक्षा अधिक असल्यास चिठ्ठ्या टाकून सोडतीद्वारे, संगणक किंवा कोणत्याही तत्सम यंत्रणेद्वारे वाटप केले जाईल. नोंदणीकृत पथविक्रेत्यांमधील विक्री जागानिहाय वाटप चिठ्ठ्या टाकून सोडतीद्वारेदेखील करण्यात येईल.
एखाद्या कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तीला (नवरा व बायको आणि अवलंबित मुले यांचे मिळून बनलेले) विक्री प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
ज्यांची उपजिविका न्यायालयाच्या अधिनिर्णयामुळे बाधित झाली आहे, त्यांच्या पुनर्वसनाकरिता योजना तयार करण्यासाठी राज्य शासनास निर्देश देण्यात येईल.
उत्सव हंगाम, मेळा इत्यादी तात्पुरत्या कालावधीसाठी विक्रेत्याला विक्री करण्याासाठी स्थानिक प्राधिकरणाद्वारे विहित नमुन्यात किमान एक महिना आधी नगर पथविक्री समितीकडे अर्जदार अर्ज करेल.
अयशस्वी पात्र अर्जदारांची प्रतीक्षा यादी पथविक्री जागेच्या उपलब्धतेवर भविष्यामध्ये विचारार्थ ठेवण्यात येईल.