प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे धूमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:00 AM2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:01:06+5:30
बदलीकरिता शिक्षकांनी अर्जही ऑनलाईन केले आहेत. प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने बदल्यांचे नियोजन केले आहे. याकरिता झेडपी शिक्षण विभागात बदल्यांची कार्यवाही १८ ते २४ जुलैपर्यंत केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेत यंदा प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन देण्यात आल्याने बदलीपात्र ठरणाऱ्या शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान शिक्षक, पदविधर शिक्षक व मुख्याध्यापक यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून २४ जुलैपर्यंत सादर कराव्यात, असे निर्देश सीइओ अमोल येडगे यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
बदलीकरिता शिक्षकांनी अर्जही ऑनलाईन केले आहेत. प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने बदल्यांचे नियोजन केले आहे. याकरिता झेडपी शिक्षण विभागात बदल्यांची कार्यवाही १८ ते २४ जुलैपर्यंत केली जाणार आहे.
तालुक्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे
यंदा प्राथमिक शिक्षकांच्या १५ टक्के मर्यादेत बदल्या होतील व ही प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावयाची आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व बीईओंना सूचना दिल्या आहेत. बदलीपात्र शिक्षकांचे अर्ज स्वीकारणे, अर्जांची पडताळणी, शाळांतील अंतर तपासणे, संवर्गनिहाय तात्पुत्या विनंती व प्रशासकीय बदल्यांची यादी प्रसिद्ध करणे, सुधारित अंतिम यादी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हास्तरावर सादर करण्याची सर्व जबाबदारी बीईओंवर सोपविली.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश धडकले आहेत. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बदल्यांबाबत नियोजन करून पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे.
- नितीन उंडे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक