भंगार गाड्यांतही त्याने दिली एसटीची सुरक्षित सेवा
By admin | Published: August 24, 2015 12:35 AM2015-08-24T00:35:09+5:302015-08-24T00:35:09+5:30
एसटी गाड्यांमुळे प्रवासी समाधान नाहीत. अशा परिस्थितीत सतत ९ हजार १२५ दिवस कोणताही अपघात न घडू देता सुरक्षित सेवा देणे एसटीचालकाला सोपे नाही.
चांदूरबाजार : एसटी गाड्यांमुळे प्रवासी समाधान नाहीत. अशा परिस्थितीत सतत ९ हजार १२५ दिवस कोणताही अपघात न घडू देता सुरक्षित सेवा देणे एसटीचालकाला सोपे नाही. हे सध्या राज्यात एसटीच्या वाढत्या अपघाताच्या संख्येवरून दिसून येते. मात्र याला अपवाद ठरला तो चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी एसटीचालक मो. शफी सौदागर.
सन १९८९ मध्ये मो. शफी एसटीच्या सेवेत चालकपदी रुजू झाले. तेव्हापासून आजपर्यंत एकूण ९ हजार १२५ दिवस म्हणजेच सलग २५ वर्षे चालक म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांच्या कडून एकही अपघात घडला नाही. इतकेच काय तर मार्गात येणाऱ्या प्राण्यांच्याही जीवाला त्यांचेकडून धोका झाला नसल्याचे ते सांगतात. एसटीच्या चालक पदावर उपजिविका भागविणारे मो. शफी यांचे समाज कार्यातही महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी २००७ मध्ये नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या तालुक्यातील ७५० नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी कोणताही अतिरिक्त मोबदला न घेता दिलेल्या सेवेबद्दल शासनाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. आगार व्यवस्थापक सूर्यकांत देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वा.नि. मकेश्वर, श्रीधर फुके, रुखंडे, प्रभाकर वासनकर, कारस्कर, बनसोडसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)