दिव्यांग मुलांसाठी ‘तो’ बनला आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:31+5:30
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील १२ बाय १० फुटाच्या खोलीत राहणारे नरेश कुत्तरमारे यांना दोन्ही मुले जन्मत:च दिव्यांग आहेत. मोठा मुलगा शुभम १३ वर्षांचा झाला तरी त्याला धड उभे राहता येत नाही. बोलता येत नाही. अनेक शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी नेले; ९० टक्के दिव्यांग प्रमाणपत्राशिवाय काहीच मिळाले नाही. मुलगी गायत्री ११ वर्षांची. तिची शारीरिक, मानसिक स्थिती शुभमपेक्षाही कठीण.
मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : प्रत्येक मुलासाठी आई महत्त्वाची असते. सुरुवातीची काही वर्षे तर मुले आईशिवाय राहूच शकत नाहीत. मात्र, दोन्ही मुले दिव्यांग जन्मल्यामुळे आई सोडून गेली, तर या दोन दिव्यांगांसाठी वडीलच आई बनले. अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या बापाची ही कहाणी पाषाणहृदयालाही पाझर फोडणारी आहे.
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील १२ बाय १० फुटाच्या खोलीत राहणारे नरेश कुत्तरमारे यांना दोन्ही मुले जन्मत:च दिव्यांग आहेत. मोठा मुलगा शुभम १३ वर्षांचा झाला तरी त्याला धड उभे राहता येत नाही. बोलता येत नाही. अनेक शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी नेले; ९० टक्के दिव्यांग प्रमाणपत्राशिवाय काहीच मिळाले नाही. मुलगी गायत्री ११ वर्षांची. तिची शारीरिक, मानसिक स्थिती शुभमपेक्षाही कठीण. ना बोलता येत, ना चालता. दोन्ही मुले दिव्यांग जन्मल्याने नरेशची पत्नी २०१२ साली घर सोडून गेली. तेव्हापासून दोन्ही मुलांच्या प्रात:विधी, तोंड धुण्यापासून आंघोळीपर्यंत तर घास भरविणे असा त्यांचा दिनक्रम बनला आहे.
संघर्षातही जीवन जगण्याची जिद्द
दोन्ही मुले दिव्यांग असल्याने नरेश कुत्तरमारे यांना घर सोडून जाता येत नाही. बाहेर कामाला जायचे असेल, तर शुभमचे हातापाय बांधण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नरेश घराच्या आजूबाजूला असलेली काही कामे करतात. शासनाकडून दोन्ही दिव्यांग मुलांना मानधन मिळते. त्यावर घरात काही धान्य येते. दोन्ही मुलांना गावातील शाळेत टाकल्याने खिचडी घरी येते. एका वेळेला खिचडी तिघे जण खाऊन कशीबशी भूक भागवितात, तर रात्रीला उपाशी झोपावे लागते. संघर्षातही मुलांचे पालनपोषण करण्याची जिद्द नरेशमध्ये आहे.
दोन्ही मुले दिव्यांग असल्याने नरेश कुत्तरमारे यांना शेतात कामाला जाणे शक्य होत नाही. शासनाकडून त्यांना अधिक मानधन मिळावे, यासाठी प्रयत्न करू.
- सुरेश निमकर, जि.प. सदस्य