चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी ‘तो’ बनला ‘आरटीओ’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:21+5:302021-06-20T04:10:21+5:30
फोटो पी १९ चांदूरबाजार विक्रीसाठी नेमलेत एजंट : बनावट आरसी बनवून चोरीच्या वाहनांची विक्री प्रदीप भाकरे अमरावती: चोरीचे वाहन ...
फोटो पी १९ चांदूरबाजार
विक्रीसाठी नेमलेत एजंट : बनावट आरसी बनवून चोरीच्या वाहनांची विक्री
प्रदीप भाकरे
अमरावती: चोरीचे वाहन सहजासहजी कुणी विकत घेत नाही, जुने वाहन खरेदी करत असताना वाहनाची आरसी (रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट) देखील पाहिली जाते. सबब, ‘त्या’ चोरांसमोर चोरीच्या दुचाकीच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला. मग काय, चोरांच्या टोळीतील एक तरूणच खुद्द ‘आरटीओ’ बनला. अन् सुरू झाला वाहनांची बनावट आरसी बनविण्याचा गोरखधंदा. त्यातून चक्क ३१ चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यात आली.
शिरजगाव बंड येथील एका २४ वर्षीय आरोपीने चोरीच्या वाहनांची बनावट आरसी बनवून ग्राहकांना देत असल्याच्या कबुलीजबाबानंतर हा प्रकार उघड झाला. अन् काही वेळासाठी पोलीस यंत्रणा देखील अवाक झाली. त्यामुळे आता आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी व चांदूरबाजार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलिकडे दुचाकी चोरांनी धूम केली. विविध गुन्हे देखील दाखल झालेत. पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तीनही पोलीस ठाणे प्रमुखांचा ‘क्लास’ घेतला. बरहुकूम, तीनही पोलीस ठाण्यांनी संयुक्त अभियान राबवून माहितीची जमावाजमव केली. यात पहिल्यांदा हाती आला तो सोनोरीचा उज्वल बोराडे. एकामागून एक नावे समोर येत गेली. त्यातच एका आरोपीने चोरीच्या दुचाकी दोन एजंटला विक्रीसाठी दिल्याची माहिती समोर आली. एक एक करत चोरांची संख्या पोहोचली सातवर. त्यांचेकडून तब्बल २० लाख ३० हजार रुपये किमतीच्या २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर बनावट आरसी बनवून त्या विकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. अन् सरफराज मन्सूर अली शहा (२४, शिरजगाव बंड) याला गजाआड घेण्यात आले. गजाआड असताना त्याने बनावट आरसी बनवून ती ग्राहकांना बनवून देत असल्याची कबुली दिली.
आरटीओच्या संकेतस्थळाचा घेतला आधार
वाहनाचा मालक, वाहन घेतल्याची दिनांक, वाहनाचा प्रकार असे एका क्लिकवर सांगणारे आरटीओचे एक अॅप आहे. त्यात वाहन क्रमांक टाकल्यास वाहनांची इत्यंभूत माहिती समोर येते. त्या अॅपचा आधार घेऊन आरोपी सरफराज मन्सूरअली शहा याने बनावट आरसी बनविण्याचा गोरखधंदा के ला, असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. चोरीच्या वाहन विक्रीसाठी त्याने किती बनावट आरसी बनविल्या, त्या बनावट आरसीच्या आधारे किती वाहनांची विक्री झाली, हे तपासात समोर येणार आहे.
आरोपी तरूण, नवखे अन् एकाच तालुक्यातील
दुचाकी चोरीचे रॅके ट गजाआड केल्यानंतर त्या सात जणांविरूद्ध कुठे गुन्हे दाखल आहेत का, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. मात्र, अद्यापतरी त्यांच्याविरूद्ध असे कुठलेही गुन्हे नोंद नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे सातही आरोपी केवळ २१ ते २८ या वयोगटातील व चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी, पिंपरी, हैदतपूर वडाळा, शिरजगाव बंड, माधान या शेजारी गावांतील आहेत.
आणखी दोन दुचाकी जप्त
१८ जून रोजी अटक सात आरोपींकडून २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर त्यानंतर आणखी दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याने चोरीच्या दुचाकींची संख्या ३१ वर पोहोचली आहे. त्या दोन दुचाकी धारणी व चांदूरबाजार येथून जप्त करण्यात आल्या.
कोट
दुचाकी चोरीप्रकरणी शुक्रवारी सात तरूण आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एका आरोपी वाहनांची बनावट आरसी बनवत होता. त्याने ती कल्पना एका अॅपवरून उचलली होती, अशी कबुली दिली आहे.
सुनील किनगे,
ठाणेदार, चांदूरबाजार
-----