मुलगी पळवण्यासाठी ‘तो’ पंजाबहून आला परतवाड्यात, अडकला नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 10:17 PM2022-06-16T22:17:18+5:302022-06-16T22:17:42+5:30
Amravati News इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून पंजाबहून थेट परतवाडा गाठत एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ वर्षीय मुलाला नागपूर रेल्वे पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले.
अमरावती : इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून पंजाबहून थेट परतवाडा गाठत एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका १७ वर्षीय मुलाला नागपूर रेल्वे पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. अल्पवयीन अपहरणकर्ता लुधियाना जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने त्या अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंध बनविण्याच्या हेतूने पळवून नेण्याचा प्रयत्न केला, अशा तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला बालगृहात पाठविण्यात आले आहे.
परतवाडा येथील एका अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवर या १७ वर्षीय मुलाशी ओळख झाली. पुढे दोघांमधील प्रेमसंवाद वाढला. तासन तास दोघांचाही वेळ सोशल मीडियावर जाऊ लागला. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान, एकमेकांना पाहण्याची ओढ आणि प्रेमातिरेकामुळे तो १२ जूनच्या सुमारास घरी काहीही न सांगता पंजाबहून अमरावतीच्या प्रवासाला निघाला. १३ जून रोजी बडनेरा रेल्वे स्टेशन गाठले. तेथून तो एसटीने परतवाडा शहरात पोहोचला. आपण परतवाड्यात पोहोचल्याची माहिती मैत्रिणीला दिली. १४ जून रोजी कुटुंब निद्राधीन असताना पहाटे २.१५ च्या सुमारास तो मुलीच्या घराबाहेर पोहोचला. तिला घेऊन तो ऑटोरिक्षाने पसार झाला. पुढे हे जोडपे नागपूरला पोहोचले. इकडे मुलगी दिसत नाही म्हणून प्रचंड शोधाशोध करीत असताना तिच्या पालकांनी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. तक्रार नोंदविणे सुरू असतानाच त्या मुलीला एका मुलासह ताब्यात घेतल्याची माहिती नागपूर आरपीएफने परतवाडा पोलिसांना दिली.
आरपीएफ नागपूरच्या माहितीवरून महिला अंमलदारांसह दोन पोलिसांना नागपूरला पाठविण्यात आले. तेथून त्या अल्पवयीन मुला-मुलीला बुधवारी ताब्यात घेण्यात आले. मुलीला पालकाच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाला बालगृहात हलविण्यात आले. तो तिला लुधियाना येथे पळवून नेण्याच्या प्रयत्नात होता.
- संतोष ताले, ठाणेदार, परतवाडा