पत्नी, मुलीचा खून करून त्याने केली आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:16+5:302021-07-03T04:10:16+5:30
येवदा : दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे मायलेकीचा कुजलेल्या अवस्थेत, तर पित्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. शुक्रवारी सायंकाळी ...
येवदा : दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे मायलेकीचा कुजलेल्या अवस्थेत, तर पित्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना उघड झाली. पत्नीचा मृतदेह घराच्या कोपऱ्यात, तर मुलीचा मृतदेह पलंगाखाली आढळून आला. घटनास्थळावरील एकंदरीत परिस्थितीवरून पत्नी व मुलीचा खून करून पतीने स्वत:ला संपविले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष येवदा पोलिसांनी काढला आहे.
मृतांमध्ये अनिल दिनकर देशमुख (४५), त्यांची पत्नी वंदना देशमुख (४०) व मुलगी साक्षी अनिल देशमुख (१७) यांचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास देशमुख यांच्या घरातून कुजट वास येत असल्याने काही शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात डोकावले असता, हा प्रकार उघड झाला. मायलेकीचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आले. बाजूच्या घरात अनिल देशमुख यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यामुळे लागलीच येवदा पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार अमूल बच्छाव सहकाऱ्यांसह भामोद येथे पोहोचले असून, वृृत्त लिहिस्तोवर घटनेचा नेमका उलगडा झालेला नव्हता. अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिवसभरात केव्हातरी आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात, तर मुलीचा मृतदेह गोधडीत पलंगाखाली दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीचा मृतदेह दिसू नये, यासाठी मृतक अनिल देशमुख याने आजूबाजूला धान्याचे पोते लावून ठेवल्याची बाब निदर्शनास आली आहे. वहिनीच्या घरात अनिल देशमुख याने गळफास घेतला.
कोट
भामोद येथे एका घरात तीन मृतदेह आढळून आले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षकांसह आमचा ताफा पोहचला आहे. पत्नी व मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक कयास आहे.
- अमूल बच्छाव, ठाणेदार, येवदा पोलीस ठाणे