आईला फोन करून त्याने संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:04+5:302021-02-06T04:23:04+5:30
नेरपिंगळाई : आईला फोन करून ‘लवकर घरी येशील व मोबाईलमध्ये काही तरी आहे, ते बघशील’, असे बोलून ...
नेरपिंगळाई : आईला फोन करून ‘लवकर घरी येशील व मोबाईलमध्ये काही तरी आहे, ते बघशील’, असे बोलून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नजीकच्या विचोरी येथे शुक्रवारी सकाळी ९:३० ते १० वाजता दरम्यान ही घटना घडली. शुभम माणिक प्रजापती (१८) असे मृताचे नाव आहे.
शुभमची आई व लहान बहीण शेतात कामाला गेल्या होत्या, तर वडील मिस्त्री काम करायला अमरावतीला गेले होते. हीच संधी साधत त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी तो आईशी फोनद्वारे बोलला. काही वेळातच ही घटना उघड झाली. शुभम हा बारावी शिकलेला होता. शेतमजुरी करणाऱ्या शुभमने आत्महत्या का केली, ते स्पष्ट होऊ शकले नाही. शिरखेड पोलीस ठाण्यातील बिट जमादार विनोद धर्माळे यांनी घटनासस्थळ गाठत पंचनामा केला. तथा त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. प्रजापती यांच्या घरी शोकमग्न वातावरणामुळे तूर्तास शुभमच्या मोबाईलमध्ये काय? तो आईला काय दाखवू इच्छित होता, ते उलगडू शकले नाही.