‘त्या’ने युपीतून केले ‘सुसाईड’चे नाटक; ‘ती’ इकडे खरंच फासावर लटकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 09:41 PM2023-01-10T21:41:32+5:302023-01-10T21:42:11+5:30

Amravati News सोशल मिडियावरून ओळख झाल्यानंतर प्रियकराने, मी आत्महत्या करत आहे, असे भासवलेले खोटे नाटक खरे समजून अमरावती जिल्ह्यातील एका तरुणीने खरोखरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

'he' performed 'Suicide' from UP; 'She' really hanged here! | ‘त्या’ने युपीतून केले ‘सुसाईड’चे नाटक; ‘ती’ इकडे खरंच फासावर लटकली!

‘त्या’ने युपीतून केले ‘सुसाईड’चे नाटक; ‘ती’ इकडे खरंच फासावर लटकली!

googlenewsNext
ठळक मुद्देसव्वा वर्षानंतर उलगडले तिच्या मृत्युचे रहस्य

अमरावती: तो उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्हयातला. ती अचलपूर तालुक्यातील एका गावची. तो एकविशीत. ती अवघी पंधराची. फेसबुकहून ओळखी झाली. अन् लागलीच दोघे प्रेमात पडले. मग काय ‘जीना मरना तेरे संग’ च्या आणाभाका झाल्या. तो म्हणाल ‘मै तेरे लिए जान दे सकता हूॅं’ तीही उत्तरली. मै भी. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने व्हॉट्सॲप चॅटींग करत तुझ्यासाठी आत्महत्या करत असल्याचे फोटो, व्हिडिओ तिला पाठविले. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेली ती देखील म्हणाली, मी पण मरू शकते. तिने खरोखर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने मात्र आत्महत्येचे केवळ नाटक केले.

             तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेली अल्पवयीन तरूणाई, सोशल मिडियाने त्यांच्यावर केलेले गारूड. त्यातील आभासी प्रेम, आकर्षणाने त्या १६ वर्षीय मुलीने आत्मघात करवून घेतला. आकस्मिक मृत्युचा तपास करत असताना परतवाडा पोलिसांनी फेसबुक व व्हॉट्सॲप चॅटवरून या खळबळजनक घटनेचा धक्कादायक उलगडा केला.

अचलपूर तालुक्यातील त्या १६ वर्षीय मुलीने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी आत्महत्या केली होती. घटनेच्या सव्वा वर्षानंतर १० जानेवारी रोजी परतवाडा पोलिसांनी कानपूर जिल्हयातील अकबरपूर येथील एका फेसबुक व व्हॉट्सॲप क्रमांक धारकाविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्या मुलीचा मोबाईल तपासत असताना एकेक चॅटचा  तपास करण्यात आला. त्यासाठी व्हॉट्सॲप व फेसबुकशी देखील इमेलने पत्रव्यवहार करण्यात आला. त्या मुलीशी चॅट करणारा व्यक्ती अस्तित्वात असल्याची पुरेशी खात्री झाल्यानंतर व युपीतील पोलिसांनी बेभापती नामक त्या फेसबुकधारकच्या वडिलांशी संवाद साधल्यानंतर परतवाडा पोलिसांनी नावानिशी गुन्हा दाखल केला.

असा आहे घटनाक्रम

२५ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलीचे वडिल अमरावती येथे कामाला आले होते. त्यादरम्यान त्यांच्या १६ वर्षीय मुलीने घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. ते अचलपूर सरकारी दवाखान्यात गेले असता, तिला मृत घोषित करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. मात्र, मृत मुलीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यातील व्हॉट्सॲप व फेसबुक चॅट तपासण्यात आले. त्यातून घटनेचा उलगडा झाला.

तपासादरम्यान झाला धक्कादायक उलगडा

बेभापती लालाराम नामक तरूणाने तिच्याशी फेसबुकवरून मैत्री केली. मोबाईल कॉलवर संपर्क करून त्याने तिच्यासोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले होते. व्हॉटस ॲपवर चॅटिंग करून तिला स्वत: आत्महत्या करीत असल्याबाबतचे फोटो व व्हिडिओ पाठविले. त्याने टाकलेले व्हिडिओ व फोटो पाहून तिने घरी कुणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. हे सूक्ष्म तांत्रिक तपासादरम्यान स्पष्ट झाले.
 

कानपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित फेसबुक व मोबाईल क्रमांक धारक व्यक्ती अस्तित्वात असल्याचे सांगितले. सूक्ष्म तांत्रिक तपासानंतर त्यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा उलगडा झाला. पोलीस पथक उत्तरप्रदेशात पाठविले जाईल.
संदीप चव्हाण, ठाणेदार, परतवाडा

Web Title: 'he' performed 'Suicide' from UP; 'She' really hanged here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.