‘तो’ विष घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:58 PM2019-07-16T23:58:18+5:302019-07-16T23:58:30+5:30
अटकेच्या भीतीने रेकॉर्डवरील अट्टल चोराने विषाचे घोट घेतच पोलीस ठाणे गाठल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास येथे घडली. येवदा ठाण्यात घडलेल्या या अनपेक्षित घटनेने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. त्या कुख्यात आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
येवदा : अटकेच्या भीतीने रेकॉर्डवरील अट्टल चोराने विषाचे घोट घेतच पोलीस ठाणे गाठल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास येथे घडली. येवदा ठाण्यात घडलेल्या या अनपेक्षित घटनेने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. त्या कुख्यात आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
श्रावण प्रल्हाद रायबोले (३६, रा. लेंडीपुरा, येवदा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, श्रावण प्रल्हाद रायबोले हा अट्टल चोर व खिसेकापू आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. पैकी काही गुन्ह्यांच्या चौकशीसंदर्भात त्याला दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. तो मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजर झाला. तेथे पोहोचताच त्याने आपण विषारी औषध प्राशन केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही तसे निरीक्षण नोंदविले. भंबेरी उडालेल्या पोलिसांनी प्रथम स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात, नंतर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात व पुढे अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्याने केवळ भीतीपोटी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. आरोपीचे वडील प्रल्हाद भिकाजी रायबोले व भाऊ विकास प्रल्हाद रायबोले यांच्याविरुद्धही घरफोडी व खिसे कापून चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल असून, ते सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलिसांनी त्याचे बयान घेतले असता, पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीपोटी आपण विषारी औषध प्राशन करीत पोलीस ठाणे गाठल्याचे त्याने सांगितले.
आरोपी श्रावण प्रल्हाद रायबोले याला दोन दिवसांआधी काही गुन्ह्यांच्या चौकशीबाबत बोलावले होते. मंगळवारी तो विषारी औषध घेऊन पोलीस ठाण्यात आला. त्याची अवस्था बघून आधी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तो कुख्यात आरोपी आहे.
- तपन कोल्हे ठाणेदार,येवदा