मृत्यूच्या दाढेतून तो परतला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:46 PM2017-11-13T22:46:43+5:302017-11-13T22:46:57+5:30
स्त्यालगत शौचास बसलेल्या चिमुकल्याने आईचा हात झटकून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि तो भरधाव एसटीखाली आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रस्त्यालगत शौचास बसलेल्या चिमुकल्याने आईचा हात झटकून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि तो भरधाव एसटीखाली आला. चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक दाबल्याने तो चिमुकला मागील चाकाखाली येण्याआधीच एसटी थांबली. अंगावर शहारे आणणारी ही घटना सोमवारी लोणी ठाण्याच्या हद्दीतील जसापूर येथे घडली.
साडेतीन वर्षाचा उत्कर्ष अमोल मुंदे (रा. जसापूर) हा आई व मोठ्या भावासोबत सकाळी १० वाजता बस थांब्यावर आला होता. उत्कर्षला शौचास लागल्यामुळे आईने त्याला अमरावती-यवतमाळ मार्गाच्या कडेला बसविले. मात्र, शौचास बसलेल्या उत्कर्षने अचानक आईचा हात झटकून वाहतुकीच्या रस्त्यावर पळ काढला. त्याला पकडण्यासाठी आईने प्रयत्न केला, मात्र, तोपर्यंत रस्त्याच्या मधोमध तो गेला होता. एमएच ४० एन-८६७८ क्रमांकाची दारव्हा-अमरावती भरधाव एसटी यावेळी आली. प्रसंगावधान राखून चालकाने एअरब्रेक करकचून दाबले. मात्र, उत्कर्ष एसटीच्या खाली आलाच. एसटी थांबताच उत्कर्ष मागील चाकापुढे आढळला. इकडे मुलगा एसटीखाली आल्याचे पाहून त्याच्या आईने एकच आक्रोश केला. तिने धाव घेत उत्कर्षला चाकाजवळून काढले. किरकोळ जखमी झालेला उत्कर्ष भेदरल्यामुळे बोलत नव्हता. आईचा आकांत पाहून लगेच चालक एस.एम. पुरी व वाहक ए.पी. बन यांनी दोघा मायलेकांना एसटीत बसवून बडनेरा डेपो गाठले. बसमधील प्रवाशांना तेथेच उतरवून उत्कर्षला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. उत्कर्षच्या डोक्याला व पायाला किरकोळ जखमाच असल्याचे निदर्शनास आले. याप्रसंगी चालकाने उत्कर्षला तत्काळ उपचारासाठी आणून माणुसकीचे दर्शन घडविले.