तो म्हणाला ‘चुकले असेल तर माफ करा’
By admin | Published: August 21, 2015 12:50 AM2015-08-21T00:50:25+5:302015-08-21T00:50:25+5:30
तालुक्यातील आडनदी फाटा येथे मंगळवारी एका दरीत आई व मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या की आत्महत्या याचा खुलासा अजूनही झाला नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे.
आजाराच्या नैराश्येतून मृत्यूचा कयास : मायलेकाच्या मृत्यूचे गुढ कायम
नरेंद्र जावरे चिखलदरा
तालुक्यातील आडनदी फाटा येथे मंगळवारी एका दरीत आई व मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या की आत्महत्या याचा खुलासा अजूनही झाला नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे. दुसरीकडे मृत ऋषिराज नागले यांनी शेजाऱ्यांना ‘काही चुकले असेल तर माफ करा’ अशी माफी मागत घरुन गेल्यावर त्याचा मृतदेह आढळून आल्याचे तपासात उघड झाले आहे.
मंगळवारी आडनदी फाटा येथे एका ५०९ फूट दरीत दोन मृतदेह कुजलेल्या व नग्न अवस्थेत आढळले. याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी पोलिसात दिली. दोन्ही मृतदेहाबाबत तर्क वितर्क काढले. रात्री ८ वाजताच्या मृताच्या मुलीसह परिजनांनी अज्ञात मृतदेह ऋषीराज लालू नागले (५१) व त्याची आई सुमित्रा लालू नागले (७५) रा.कविठा ता.अचलपूर अशी त्यांची ओळख पटविली. अज्ञात मृतदेह असल्याने पर्यटक की स्थानीय रहिवाशी, अशी माहिती पुढे येत होती. मृतदेह कुजल्याने घटनास्थळी दोन्ही मृतदेह नग्न व साडी नसलेल्या अवस्थेत सापडल्याने हत्या की आत्महत्या या बाबत संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही मृतदेहाचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर पोलिसांना हत्या की आत्महत्या हे स्पष्ट करण्यास मदत होणार आहे.
दोघांना आजाराने ग्रासले
मृत ऋषिराज लालू नागले हा 'अॅपेंडीक्स' च्या आजारामुळे त्रस्त होता. त्यांची आई म्हातारी झाल्याने तिला प्रात:विधीचा सततचा त्रास होता. १४ आॅगस्ट रोजी दोघेही घरुन जाताना दवाखाण्यात उपचारासाठी जात असल्याचे पत्नी मुन्नी व मुलांना सांगितले. मात्र, त्यानंतर दोघेही परतलेच नाही. आजाराने दोघेही ग्रस्त असल्याची माहिती पोलिसांना दिली. या आजाराने ग्रस्त झाल्यामुळे जीवन यात्रा संपविली का, याचा तपास पोलीस करीत आहे.
चुकले असेल तर माफ करा
ऋषिराज नागले यांच्या शेजारी राहणाऱ्या काळे नामक इसमाची भेट घेतली व ‘आपले काही चुकले असेल तर माफ करा’ असे शब्द उच्चारले, दोघांचे काही संभाषण झाले. शेजाऱ्यांना अचानक माफी मागत ऋषिराज नागले आई सुमित्राला घेऊन निघून गेले. त्यानंतर ते परतलेच नसल्याची पोलीस तपासात पुढे आले आहे. ‘माफी मागताना ऋषिराज नागले यांचे डोळे पानावले व अश्रुसुध्दा बाहेर पडले.
आॅटोने गेले आडनदीपर्यंत
दवाखान्यात जाण्यास निघालेल्या नागले मायलेकांनी परतवाडा येथून एक आॅटो केला व आडनदीपर्यंत गेले. सुधीर नामक रिक्षाचालकाने स्वत: पुढे येऊन ही माहिती पोलिसांना दिली आहे.
दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाला यासाठी व्हिसेरा पाठविण्यात आला आहे. सर्व पध्दतीने बारीक-सारीक माहिती गोळा करण्यात येत असून मृत्यूचे कारण शोधले जात आहे.
- नितीन गवारे, ठाणेदार चिखलदरा.