‘तो’ कंत्राटदार आयुक्तांना शरण

By admin | Published: January 25, 2017 12:03 AM2017-01-25T00:03:06+5:302017-01-25T00:03:06+5:30

स्वास्थ्य अधीक्षकाच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्याने संबंधितांंचे धाबे दणाणले आहेत.

'He' surrendered to the contractor's commissioner | ‘तो’ कंत्राटदार आयुक्तांना शरण

‘तो’ कंत्राटदार आयुक्तांना शरण

Next

राजकीय व्यक्तीची मध्यस्थी : बनावट देयक प्रकरण
अमरावती : स्वास्थ्य अधीक्षकाच्या बनावट स्वाक्षरी प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्याने संबंधितांंचे धाबे दणाणले आहेत. आयुक्तांच्या दिशानिर्देशांवरून अतिरिक्त आयुक्तांनी सोमवारी दुपारीच संबंधिताविरूद्ध फौजदारी तक्रार नोंदविण्याचे आदेश काढलेत. याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये झळकताच संबंधित कंत्राटदार आयुक्तांना राजकीय व्यक्तिंच्या मध्यस्थीने शरण गेला.
मंगळवारी दुपारी एका स्थानिक राजकीय व्यक्तीला सोबत घेऊन त्या कंत्राटदाराने आयुक्तांचे कार्यालय गाठले. मात्र आयुक्तांसमोर न जाता त्या राजकीय व्यक्तिंच्या माध्यमातून त्याने त्याची भूमिका आयुक्तांपर्यंत पोहोचविली. आयुक्त आणि त्या राजकीय व्यक्तींमधील संभाषणाचा तपशील मिळाला नसला तरी सुमारे तासभर बनावट स्वाक्षरी प्रकरणाबाबत चर्चा झाली. दरम्यान नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडेंसह अन्य अधिकारी आयुक्तांच्या दालनात शिरल्याने याचर्चेला बे्रक लागला. प्रत्यक्षदर्शींनुसार त्या कंत्राटदाराने ती स्वाक्षरी आपण केली नसल्याचा दावा आयुक्तांकडे केला आहे.
‘बनावट स्वाक्षरीने १० लाखांचे बिल’ व ‘बनावट स्वाक्षरीप्रकरणी एफआयआर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने साफसफाई देयकांमधील गोरखधंदा उघड केला होता. प्रशासनातील काहींनी हे प्रकरण दडपले होते. मात्र हा प्रकार उघड होताच प्रशासनातून सूत्रे हलली. अन्यथा हा सर्व प्रकार ‘शो कॉज’पर्यंत मर्यादित ठेवण्यात आला होता. बडनेरा येथील प्रभाग क्रमांक ४१ आणि ४२ या दोन प्रभागांतील जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांच्या साफसफाईच्या देयकांवर स्वास्थ्य अधीक्षक अरूण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली. ही बाब अतिरिक्त आयुक्तांच्या लक्षात येताच त्यांनी तिजारेंना विचारणा केली. ती स्वाक्षरी आपली नसल्याचे तिजारे यांनी सांगताच तिघांना ‘शो-कॉज’बजावल्या. मात्र, त्यातून बनावट स्वाक्षरी कुणाची, हे उघड झाले नाही. हेप्रकरण आयुक्तांकडे गेल्यानंतर बनावट स्वाक्षरी करणाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्याचे आदेश तिजारेंना देण्यात आले.
‘लोकमत’मध्ये वृत्त झळकताच आपल्या संस्थेची नाहक बदनामी होत असल्याची भूमिका त्या कंत्राटदाराने मांडल्याचे सांगण्यात आले. त्यावर पोलीस चौकशीदरम्यान ‘सत्य’ बाहेर येईल, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे आयुक्तांनी त्या राजकीय व्यक्तिला बजावले. (प्रतिनिधी)

एफआयआर केव्हा?
अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सोमवारी दुपारी याप्रकरणी फौजदारी तक्रार नोंदविण्याचे आदेश स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे यांना दिले. मात्र २४ तास उलटूनही याप्रकरणी तिजारे यांनी तक्रार नोंदविली नाही. वकिलांकडून ड्राफ्ट तयार केल्यानंतर तक्रार नोंदवू, अशी माहिती तिजारे यांनी दिली.

देयके थांबविली
बनावट स्वाक्षरीने साफसफाईची देयके मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्तांकडे आल्याचे स्पष्ट होताच या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत तथा त्या चारही देयकांची रक्कम तुर्तास न देण्याच्या सूचनाही संबंधित घटकप्रमुखांना आयुक्तांनी दिल्या.

Web Title: 'He' surrendered to the contractor's commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.