‘त्यांनी’ एक दिवस सांभाळला संपूर्ण कार्यभार
By admin | Published: March 9, 2016 01:08 AM2016-03-09T01:08:32+5:302016-03-09T01:08:32+5:30
महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाने सर्व महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसासाठी ठाणेदारपद दिले.
महिला पोलीस बनल्या ठाणेदार : महिला दिनी प्रोत्साहनात्मक उपक्रम
अमरावती : महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाने सर्व महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसासाठी ठाणेदारपद दिले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १० पोलीस ठाण्यांत पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत दहा महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी एक दिवस प्रभारी ठाणेदार म्हणून कामकाज पाहिले.
पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मंगळवारी १० महिला पोलीस अधिकाऱ्यांना ठाणेदारपदाची धुरा सांभाळण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार राजापेठ पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कान्होपात्रा बनसा, खोलापुरी गेटमध्ये सुजाता बन्सोड, फे्रजरपुरामध्ये शीतल निमजे, बडनेरामध्ये प्राजक्ता धावडे, वलगावमध्ये एन.के. भोई, नांदगाव पेठमध्ये कविता पाटील, नागपुरी गेटमध्ये भारती इंगोले, गाडगेनगरमध्ये वैशाली चव्हाण तर शहर कोतवाली ठाण्यात माधुरी उंबरकर यांनी कामकाज पाहिले.
पोलीस ठाण्यातील अंमलदाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. ही जबाबदारी मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांभाळली. पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारी व त्यांचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांभाळली.