तो युवक कीटकनाशक फवारणी विषबाधेचाच बळी, दोन महिन्यांत तीन शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 07:25 PM2017-12-06T19:25:04+5:302017-12-06T19:25:23+5:30
अमरावती : कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथील शेतमजुराचा २२ नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाला. मात्र, कृषी विभागाने घोंगडे झटकले होते.
अमरावती : कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथील शेतमजुराचा २२ नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाला. मात्र, कृषी विभागाने घोंगडे झटकले होते. आता शवविच्छेदन अहवालअंती हा युवक विषबाधेचाच बळी असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कुटुंबास शासकीय मदत मिळावी, यासाठी महसूल विभागाद्वारा अद्यापही कार्यवाही झाली नाही. जिल्ह्यात यापूर्वी दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेला असल्याने मृतांची संख्या तीन झाली.
नितीन रामेश्वर सुरजुसे (३०) असे मृताचे नाव आहे. तो वाशिम जिल्ह्यात कारंजा लाड तालुक्यातील पिंपरी (मोखड) येथील रहिवासी होता. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने तो काही दिवसांपासून लेहगावला मामा विजय श्रीनाथ यांच्याकडे वास्तव्य करून शेतमजुरीची कामे करीत होता. मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वी नितीनने लेहगाव येथील एका शेतक-याच्या तुरीवर इमामबेंजाईड या कीटकनाशकाची फवारणी केली. कामावरून आल्यानंतर चक्कर येत असल्याने नातेवाइकांनी त्याला दर्यापूर येथील वैद्यकीय व्यवसायी राजेंद्र भट्टड यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, १५ मिनिटात त्याचा मृत्यू झाला. भट्टड यांनी कृषी विभाग व पोलिसांना नितीनचा मृत्यू हा कीटकनाशकाच्या विषबाधेने झाल्याचे कळविले असतानाही यंत्रणाद्वारा यासाठी दुजोरा दिला नव्हता.
नितीनचे निवडणूक ओळखपत्र लेहगावचे
यंदा कीटकनाशक विषबाधेचे १६० रुग्ण दाखल झालेत. यापैकी तीन शेतक-यांचा मृत्यू झाला. यामध्ये माहुली जहागीर ठाण्यांतर्गत डवरगाव येथील प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला, येवदा ठाण्यांतर्गत किरण ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला, तर २२ नोव्हेंबरला नितीन सुरजुसे या शेतमजुराचा मृत्यू झाला. त्याचे आधार कार्ड वाशिम जिल्ह्यातील, तर निवडणूक ओळखपत्र अमरावती जिल्ह्याचे आहे. त्याच्या कुटुंबाला कुठल्याही जिल्ह्यात का होईना, शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे.