-तर ‘ते’ मुख्यालयी ‘अटॅच’
By admin | Published: January 29, 2017 12:23 AM2017-01-29T00:23:38+5:302017-01-29T00:23:38+5:30
निवडणुकीतील उमेदवारांशी नातेसंबध असणाऱ्या किंवा उमेदवारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य
पोलीस आयुक्त : निवडणूक उमेदवाराशी नातेसंबध पडणार महागात
अमरावती : निवडणुकीतील उमेदवारांशी नातेसंबध असणाऱ्या किंवा उमेदवारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयी ‘अटॅच’केले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. अशा पोलिसांची माहिती काढण्याचे काम सुरु झाले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे इच्छुक व अपक्ष उमेदवारांची जय्यत तयारी सुरु आहे. यानिवडणुकीत उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये सर्वसाधारण नागरिकांसोबत पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत. इतकेच नव्हे तर काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी सुद्धा निवडणूक रिंग्ांणात उतरणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली आहे. त्यामुळे हे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना नातेसंबध जोपासून नातलगांना प्रचारात सहकार्य करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय यापूर्वी सुद्धा असले प्रकार घडले आहेत.
शासकीय कामातून वेळ काढून ते नातलग उमेदवारांची कामे करीत असल्याचे निदर्शनास आल्याने असले प्रकार रोखण्यासाठी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात आहेत, अशा पोलिसांची यादी तयार करण्याची तयारी सुरु झाली असून या पोलिसांची पेशी पोलीस आयुक्तांसमोर केली जाणार आहे. या पोलिसांच्या उमेदवारांशी असलेल्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबधांची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्त त्यांना पोलीस मुख्यालयी ‘अटॅच’ करण्याचे निर्देश देणार आहेत. त्यामुळे निवडणूक तर पूर्णत: पारदर्शक होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
निवडणुकीतील उमेदवार जर पोलिसांच्या नातेसंबधातील असेल, तर अशा पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस मुख्यालयी अटॅज करण्यात येईल. यासंदर्भात माहिती काढण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.