सुपरमध्ये डोके, मानेची जंक्शन शस्त्रक्रिया यशस्वी
By उज्वल भालेकर | Published: January 18, 2024 08:20 PM2024-01-18T20:20:28+5:302024-01-18T20:20:41+5:30
सहा तास चालली दुर्मीळ शस्त्रक्रिया, रुग्णाची प्रकृती स्थिर
अमरावती: स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे डोके व मानेचे जंक्शन (सीव्हीजे) ची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. जिल्ह्यातील खार तळेगाव येथील ३९ वर्षीय रुग्ण हा पाच वर्षांपूर्वी पडल्याने त्याला चालण्यास त्रास होत होता. परंतु, सहा तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
ही शस्त्रक्रिया कठीण व गुंतागुंतीची असून, दुर्मीळ होती. जर वेळेत शस्त्रक्रिया करण्यात आली नसती तर संबंधित रुग्णाला पक्षाघात होण्याची शक्यता होती. त्याला श्वास घेण्यास त्रास झाला असता. तसेच मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या नसलादेखील इजा होण्याची शक्यता अशा रुग्णांमध्ये असते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती चांगली आहे.
सुपरचे एमएस डॉ. अमोल नरोटे, एसडीओ डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जन डॉ. अमोल ढगे, डॉ. स्वरूप गांधी, डॉ. अभिजित बेले, डॉ. योगेश सावदेकर, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यावेळी अधिसेविका माला सुरपाम यांच्या मार्गदर्शनाखाली इन्चार्ज सिस्टर ज्योती काळे, अभिजित नीचत, मनीषा रामटेके, जीवन जाधव, अभिजित उदयकर यांनीही शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांना सहकार्य केले.