अकोली स्मशानभूमीजवळ आढळला शिर नसलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 10:53 AM2024-11-29T10:53:56+5:302024-11-29T10:54:40+5:30

Amravati : केवळ धड आढळले, खुनाचा गुन्हा, घटनास्थळी सत्तूर, चष्मा, चप्पल

Headless body found near Akoli graveyard | अकोली स्मशानभूमीजवळ आढळला शिर नसलेला मृतदेह

Headless body found near Akoli graveyard

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
अकोली गाव ते म्हाडा कॉलनी रोडवरील स्मशानभूमीसमोरील एका शिवारालगतच्या जंगलसदृश परिसरात गुरुवारी दुपारी शिर नसलेला मृतदेह आढळून आला. दुपारी दोनच्या सुमारास उघड झालेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेहापासून वेगळे केलेल्या डोक्याच्या भागाचा शोध चालविला आहे. मृताची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. अज्ञात आरोपीने त्या अज्ञात व्यक्तीच्या गळ्यावर सत्तुरने वार करून त्याचे शिर धडावेगळे केले. धड घटनास्थळीच फेकून देत शिर इतरत्र फेकले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


शिराविना असलेल्या त्या अनोळखी मृताचे वय ५० ते ६० वर्षे असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यादव नामक शेतमालकाच्या शेताच्या कुंपणापासून आत जाणाऱ्या पाऊलवाटेशेजारी एका इसमाचा मृतदेह शिराविना आहे. तथा शिर गायब आहे, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्या माहितीच्या आधारे खोलापुरी गेटचे ठाणेदार गौतम पातारे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपायुक्तद्वय गणेश शिंदे व कल्पना बारवकर यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त जयदत्त भंवर, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोरखनाथ जाधव व सीमा दाताळकर, सीआययूचे प्रमुख एपीआय महेंद्र इंगळे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. खोलापुरी गेट पोलिसांनी त्या परिसरात सर्चिग करत रक्ताने माखलेला सत्तूर, दोन वेगवेगळ्या ठिकाणी पडलेला चपलेचा जोड व चष्मा जप्त केला. मृतदेहाच्या अंगावर शर्ट व पायजमा असे कपडे आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने परिसरातील देशी दारू दुकानापर्यंत धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी युद्धस्तरावर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, मृतदेहाचे शिर देखील शोधले जात आहे. घटनास्थळाहून काही अंतरावर एक मोठी विहीर तथा अकोली रेल्वे स्टेशनदेखील आहे. धडापासून वेगळे केलेले शिर आरोपीने कुठे फेकले असावे, त्या सर्व शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सर्चिग सुरू केली आहे. सोबतच, परिसरातील नागरिकांना देखील विचारणा केली जात आहे. मिसिंग सुद्धा तपासले जात आहेत. मृतदेह इर्विनच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. 


"धारदार शस्त्राने शिर वेगळे केलेला व घटनास्थळी ते शिर नसलेला एक मृतदेह अकोली रोडवरील स्मशानभूमीलगत आढळून आला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. शिरदेखील मिळालेले नाही. अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला."
- गौतम पातारे, ठाणेदार, खोलापुरी गेट

Web Title: Headless body found near Akoli graveyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.