सावधान : चिमुकल्यांमध्ये झपाट्याने पसरतोय 'एचएफएमडी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:22 AM2018-07-20T01:22:34+5:302018-07-20T01:22:55+5:30

हात, पाय, तोंड व गुडघ्यांवर लालसर चट्टे किंवा फोड येणारा ‘हॅन्ड, फूट अ‍ॅन्ड माऊथ डिसीस’ (एचएफएमडी) चिमुकल्यांमध्ये झपाट्याने पसरत आहे. या आजाराची लक्षणे पाहून पालक वर्गसुद्धा हैराण झाला असून, प्रतिबंधक उपाय हाच या आजारावर उपचार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

Heads up: 'HFMD' is spread rapidly in smallpox | सावधान : चिमुकल्यांमध्ये झपाट्याने पसरतोय 'एचएफएमडी'

सावधान : चिमुकल्यांमध्ये झपाट्याने पसरतोय 'एचएफएमडी'

Next
ठळक मुद्देपालकवर्ग हैराण : प्रतिबंधात्मक उपाय हाच उपचार

वैभव बाबरेकर/अमरावती : हात, पाय, तोंड व गुडघ्यांवर लालसर चट्टे किंवा फोड येणारा ‘हॅन्ड, फूट अ‍ॅन्ड माऊथ डिसीस’ (एचएफएमडी) चिमुकल्यांमध्ये झपाट्याने पसरत आहे. या आजाराची लक्षणे पाहून पालक वर्गसुद्धा हैराण झाला असून, प्रतिबंधक उपाय हाच या आजारावर उपचार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

वातावरणातील बदलामुळे सक्रिय झालेल्या 'कॉक्साकी व्हायरस ए-१६' व 'ईटेरो व्हायरस ७१' मुळे एचएफएमडी बळावत आहे. हा आजार अतिशय संसर्गजन्य असून, तो तीन ते सहा दिवस राहतो. साधारणत: १ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आजाराची सर्वाधिक लक्षणे येतात. सद्यस्थितीत एचएफएमडीने जिल्हाभरात पाय पसरविले असून, बहुतांश घरांतील मुलांच्या हात, पाय, गुडघा व तोंडामध्ये लालसर चट्टे किंवा फोड आल्याचे दिसून येत आहे. हा सिझनेबल आजार असून, जुलै व आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पसरत असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ ऋषिकेश नागलकर यांनी वर्तविले आहे. सुरुवातीला ताप येणे आणि त्यानंतर लालसर चट्टे किंवा फोड येणे, ही या आजारांची लक्षणे आहेत. काही वेळेस हे लाल चट्टे किंवा फोड कंबरेवरसुद्धा येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांचे आहे. लहान मुले शाळेत जातात. अशावेळी एचएफएमडी झालेल्या मुलांकडून हा संसर्ग अन्य मुलांपर्यंत जातो. काही वेळा आजाराची लक्षणे दहा वर्षांच्या वरील व्यक्तींमध्येसुद्धा दिसून येत आहे. लहान मुलांसोबत खेळणाऱ्या पालक वर्गाला एचएफएमडीचा त्रास जाणवू लागला आहे.
दररोज दहा रुग्णांवर उपचार
सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोंदीनुसार दररोज आठ ते दहा बालरुग्ण या आजाराच्या उपचारासाठी येत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्येही दररोज या आजारासाठी अनेक बालकांवर उपचार केले जात आहे. अतिशय संससर्गजन्य असणारा हा आजार जिल्हाभरात झपाट्याने पसरत आहे.
अशी आहेत लक्षणे
एचएफएमडी आजारात सर्वप्रथम ताप येतो. त्यानंतर हळूहळू हात, पाय, गुडघे व तोंडात लालसर चट्टे किंवा फोड येतात. तीन ते सहा दिवस ही लक्षणे असतात. उपचार न केल्यास हा आजार न्यूमोनियापर्यंत पोहोचतो. ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
काय घ्यावी काळजी?
एचएफएमडी आजार संसर्गजन्य असल्यामुळे पालक वर्गाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्ग झालेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. इतर मुलांना दूर ठेवावे. खोकला व फोड असणाऱ्यांपासून दूर राहावे. खोकलताना मास्क किंवा रुमाल वापरावा. संसर्ग झालेल्या बाळांची विष्ठा स्वच्छ केल्यानंतर हात हॅन्डवॉशने निर्जंतुक करावे. मुलांच्या आहारात फळांचा वापर अधिक करावा.
असा पसरतोय आजार
व्हायरल इन्फेक्शनमुळे हवेतून पसरणारा हा आजार लहान मुलांना कवेत घेतो. शाळेतील मुलांपैकी एखाद्याला 'एचएफएमडी'चा संसर्ग झाला असल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या अन्य मुलांनासुद्धा हा आजार होतो. खोकताना उडणाऱ्या तुषारातून हे व्हायरल एका व्यक्तीपासून दुसºया व्यक्तीपर्यंत पोहोचतात. याशिवाय संसर्ग झालेल्या मुलांची विष्ठेच्या संसर्गाने हा आजार बळावू शकतो.

Web Title: Heads up: 'HFMD' is spread rapidly in smallpox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य