धामणगाव तालुक्यातील ६० हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:25+5:302021-07-19T04:09:25+5:30

पशु चिकित्सकांचा संप उपचार व लस झाली मिळेनासी पान २ बॉटम पशुपालकांना करावा लागतो संघर्ष : पशुचिकित्सक संपावर धामणगाव ...

Health of 60,000 animals in Dhamangaon taluka is in danger | धामणगाव तालुक्यातील ६० हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

धामणगाव तालुक्यातील ६० हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Next

पशु चिकित्सकांचा संप

उपचार व लस झाली मिळेनासी

पान २ बॉटम

पशुपालकांना करावा लागतो संघर्ष : पशुचिकित्सक संपावर

धामणगाव रेल्वे : घरोघरी जाऊन शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचार करणाऱ्या चिकित्सकांना संपविण्याचा घाट भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने केल्याने तालुक्यातील २५ हून अधिक पशुचिकित्सक संपावर गेले आहेत. यामुळे ६० हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात उपचार व लस मिळेनाशी झाल्याने आपल्या जनावरांना वाचविण्यासाठी पशुपालकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.

धामणगाव तालुक्यात शासकीय व खासगी पशुचिकित्सकांची संख्या २५ च्या जवळपास आहे. मागील अनेक वर्षांपासून हे पशुचिकित्सक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जनावरांवर उपचार करतात. विशेष म्हणजे, लसीकरण, बॅच टोचणे, कृत्रिम रेतन ही कामे करीत असताना शासनाने या पदविकाधारकांची पिळवणूक करून बोगस डॉक्टर म्हणून त्यांचे अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे जिवंत आहेत, त्यांच्यावरच भारतीय पशुवैद्य परिषद अधिनियम १९८४ च्या कायद्याची अट घातल्याने या पशुचिकित्सकांची सेवा धोक्यात आली आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून हे पशुचिकित्सक संपावर गेले आहेत.

अशा आहेत मागण्या

भारतीय पशुवैद्य परिषद अधिनियम १९८४ कायदा रद्द करावा. पशुसंवर्धन पदविकाधारक व्यक्तींना आरोग्य खात्यातील नर्सिंग नोंदणीकृत करण्यात यावे. नोंदणीकृत शासकीय पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली खासगी पदविकाधारकाला पशुवैद्यकीय सेवा देण्याचा सक्तीचा नियम करावा. पशुसंवर्धन विभागातील दवाखाने श्रेणी-२ अपग्रेड करून श्रेणी-१ करणे बंद करावे. सन २०१५ पासून पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून तीन वेळेस भरती काढून बेरोजगार युवकांना तीन परीक्षा शुल्क लादले. परंतु, आजपर्यंत एकही पद भरले नाही. त्यावर त्वरित निर्णय घ्यावा. शासनाच्या विविध मोहिमांमध्ये सहकार्य करूनसुद्धा बोगस म्हणून बदनाम ठरविलेला पदविका अभ्यासक्रम तात्काळ बंद करावा. पशुधन, पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम बारावी विज्ञान या अर्हतेवर किमान तीन वर्षांचा असावा. कृत्रिम रेतन करण्याचा अधिकार दहावी उत्तीर्ण व्यक्तींना न देता केवळ पशुसंवर्धन पदविकाधारक व्यक्तींना असावा. निर्बंध त्वरित हटविण्यात यावे.

धामणगाव तालुक्यात नऊ पदे रिक्त

धामणगाव पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विकास अधिकारी हे मुळात पद आतापर्यंत निर्माण झाले नाही. तिवसा येथील पशुधन विकास अधिकारी धामणगावचा कारभार पाहतात. तळेगाव दशासर येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे मंगरूळ दस्तगीर येथील कार्यभार असताना त्या भागात ते कधी फिरकले नाहीत. रविवारी तळेगाव दशासर येथे काही जनावरांना उपचारासाठी नेले असता, सुटी असल्याचे सांगून यवतमाळला निघून गेले. शेंदूरजना खुर्द येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांना हिरपूर येथे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. धामणगाव शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार चांदूर रेल्वे येथिल अधिकाऱ्याकडे आहे. मंगरूळ दस्तगीर, हिरपूर, कावली, झाडगाव येथील पशुधन पर्यवेक्षक, परिचर अशी नऊ पदे रिक्त आहेत. पावसाळ्याच्या काळातही पशुपालकांना यामुळे जनावरांवर उपचार करून घेण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे.

पाच दिवसांपासून गाय आजारी आहेत. एखाद्या व्यक्ती आजारी पडली तर अमरावती नागपूर येथे नेता येईल. मात्र, गाईला नेण्यासाठी व्यवस्था करायची कशी? आज रविवारी सर्व पशुवैद्यकीय दवाखाने फिरलो. मात्र, संपामुळे एकही पशुचिकित्सक मिळाला नाही. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मोबाईल उचलत नाही.

- नामदेव वैद्य, पशुपालक, निंभोरा बोडका

अनेक वर्षांपासून आम्ही ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा देत आहे. भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने आमच्यावर बोगस असा ठपका ठेवला आहे. त्यामुळे आम्ही संपावर आहोत. शासनाने आता तरी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

राहुल ठाकरे, अध्यक्ष, खासगी पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, धामणगाव रेल्वे

Web Title: Health of 60,000 animals in Dhamangaon taluka is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.