सफाई कर्मचाऱ्यांसाठी तीन महिन्यांत आरोग्य शिबिर
By admin | Published: May 9, 2017 12:13 AM2017-05-09T00:13:15+5:302017-05-09T00:13:15+5:30
दिलीप हातीभेड : राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सफाई कामगारांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
दिलीप हातीभेड : राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सफाई कामगारांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या कामगारांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी व शिबिर घेण्याच्या सूचना महापालिकेला केल्याची माहिती राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हातीभेड यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
महापालिकेद्वारे ही बाब मान्य करण्यात आली व आता सफाई कामगारांसाठी झोननिहाय आरोग्य शिबिर घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. हा खर्च महापालिका स्वत: सोसणार आहे. देशात सुरू असलेले स्वच्छता अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे क्रांतिकारी पाऊल आहे. परिसराची स्वच्छता राखणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने वराहपालन हे शहराच्या बाहेर हवे यासाठी महापालिकेनेही वराह पालकांना जागा उपलब्ध करून द्यावी. याविषयी सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली व त्यांनी ही बाब मान्य केली आहे. आजार हा कोणालाही होऊ शकतो. सफाई कामगारांच्या मुलांना आजार झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी केला.
सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांना पुरविण्यात आलेले गणवेश घालावेत, मास्क लावावेत हे त्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. दर हजार कर्मचाऱ्यांच्या मागे १ सफाई कामगार पाहीजे. अमरावती शहराची लोकसंख्या ६.५० लाख आहे. येथे सफाई कामगारांचे ८६१ पदे मंजूर आहेत. त्या तुलनेत ७६७ कामगार आहे. मात्र यामधील बहुसंख्य कामगार कंत्राटी असल्याचे त्यांनी सांगितले. सफाई कामगारांच्या समस्याचा निपटारा करण्यासाठी महापालिकेला ३ महिन्यांचा अल्टिमेटम दिल्याचे त्यांनी सांगितले. आयोगाच्या सदस्यपदाचा कार्यभार आपण १६ मार्च २०१७ रोजी स्वीकारला. या दीड महिन्याच्या अवधीत जबलपूर, कटनी, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व अमरावती आदी ठिकाणी बैठकी घेतल्याचे दिलीप हातीभेड यांनी सांगितले.