आरोग्यसेवा विस्कळीत
By Admin | Published: February 1, 2017 12:09 AM2017-02-01T00:09:32+5:302017-02-01T00:09:32+5:30
जिल्ह्याभरातील गोरगरिब रुग्णांच्या आरोग्य सेवेचे डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे.
इर्विनमध्ये मनुष्यबळाचा अभाव : परिचारिकांवर कामाचा ताण
अमरावती : जिल्ह्याभरातील गोरगरिब रुग्णांच्या आरोग्य सेवेचे डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. तोकड्या मनुष्यबळावर रुग्णांचा डोलारा चालत असून परिचारिकांचा कामाचा ताण वाढला असून परिचारिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोर व मद्यपींच्या त्रासाला परिचारिका कंटाळल्या असून याकडे इर्विन प्रशानसाचे दुर्लक्ष आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज विविध प्रकारे शेकडो रुग्ण दाखल होतात. रुग्णांसाठी खाटांची संख्याही अपुरी पडते. त्यामुळे अनेक वार्डात एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आढळून येते. या रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका परिचारिका पार पाडतात. तीन शिफ्टमध्ये २४ तास परिचारिका रुग्णांची अविरत सेवा करतात. मात्र, परिचारिकांच्या रिक्त पदे भरली जात नसल्यामुळे मनुष्यबळाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या परिचारिकांवरच कामाचा मोठा ताण वाढला आहे. तरीसुध्दा परिचारिका प्रत्येक रुग्णांना योग्य आरोग्य सेवा पुरविण्यासाठी झटत आहे. मात्र, दिवसरात्र आरोग्य सेवा पुरविणाऱ्या या परिचारिकांच्या सुविधाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
अशी आहे मनुष्यबळाची आकडेवारी
जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिसेविका पदावर मंदा गाढवे कार्यरत आहेत. त्या परिचारिकामार्फत रुग्णांना आरोग्य सेवा पुरवितात. सहायक अधिसेविकेची पद भरलेले आहे. मात्र, पाठ्य निर्देशिकाचे ४ पदे मंजुर असताना तीनच पदे भरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चिकीत्सलयीन निर्देशिकांची तीन पद भरलेली आहेत. मात्र, सहायक आरोग्य परिचारिकेची तीन पदे मंजुर असताना केवळ एकच पद भरलेले असून अन्य दोन पदे रिक्त आहेत. बाल परिसेविकांची तीन पदे मंजुर असतानाही केवळ दोनच पदे भरण्यात आलेली आहे. मनोरुग्ण परिसेविकांची तीन पदे मंजुर असतानाही दोन पदे अजुनही रिक्त आहे. परिसेविकांची ३२ पदे मंजुर आहेत, मात्र, केवळ ७ पदे भरण्यात आली असून २५ पदे रिक्त आहे. अधिपरिसेविकांची १४२ पदे मंजुर असताना १३० पदे भरण्यात आली असून अजुनही १२ पदे रिक्त आहेत. एएनएमची दोन पदे भरललेली असून गृहपाल व वस्त्रपालांची दोन्ही पदे रिक्त आहेत.