आदिवासींसाठी उभारलेल्या आरोग्य सेवा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:44 PM2017-10-24T23:44:02+5:302017-10-24T23:44:18+5:30
उपजिल्हा रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांची परवड होत आहे. मेळघाटातील गर्भवती मातांच्या आरोग्यसेवेसाठीच्या उपाययोजना कूचकामी ठरल्याचा एसाच एक प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : उपजिल्हा रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांची परवड होत आहे. मेळघाटातील गर्भवती मातांच्या आरोग्यसेवेसाठीच्या उपाययोजना कूचकामी ठरल्याचा एसाच एक प्रकार उघडकीस आला आहे.
धारणी शहरातील २१ वर्षीय गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्यावर सिझेरियनचे कारण सांगून तिला अमरावती येथे पाठविले. रुग्णाची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना ते परवडणारे नव्हते. येथील स्त्री व प्रसूतीतज्ज्ञ उपस्थित नव्हत्या. अन्य डॉक्टरांनीदेखील तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. दुसरीकडे येथील वैद्यकीय अधीक्षकांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
गर्भवतीला रक्तपुरवठ्यासाठी पैशांची मागणी
मेळघाटातील गोंडवाडी येथील सहा महिन्यांची गर्भवती माता प्रिया रामकिसन जावरकर हिला रक्ताची आवश्यक असल्याचे सांगून आशा व डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र जिल्हा रुग्णालयात आल्यावर तिचे पती रामकिसन जावरकर यांना रक्तपेढीत बाराशे रुपयांची मागणी केली व सोबत एक डोनर आणण्याचे सांगितले, अन्यथा रक्त मिळणार नाही, असा दमही दिला. त्याने डॉक्टर राणा यांना कळविले. मात्र फायदा झाला नाही. अखेर उपचार न मिळाल्याने परत धारणी रुग्णालयात यावे लागले.
धारणी शहरातून आरोग्य विभागाद्वारे हजारो पिशव्या रक्त संकलित केले जाते. आदिवासी रक्त विकत नाहीत, तर ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी स्वमर्जीने रक्तदान करतात. तरीही गर्भवतीला रक्त मिळू नये, ही शोकांतिका आहे.
- सतीश मालवीय,
माजी यु.कॉ. अध्यक्ष धारणी
गर्भवती मातेला आवश्यकतेनुसार रक्त नि:शुल्क देण्याची रक्तपेढीत तरतूद आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात पैशांची मागणी केली असल्यास याची चौकशी करून संबधितांवर कठोर कार्यवाही केली जाईल.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्य चिकित्सक