आयुक्तांद्वारे आरोग्य विभागाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:01:03+5:30
शहरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत ए.एन.एम. यांच्या गृहभेटी वाढवून यादरम्यान नागरिकांना स्वाइन फ्लू व डेंग्यू या आजाराची लक्षणे व घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्याबाबत निर्देश आयुक्तांनी दिले. तक्रार आल्यास त्या ठिकाणी त्वरित साफसफाई, फवारणी व धूरळणी करावी आणि ज्या ठिकाणी लार्व्हा आढळत आहेत, अशा ठिकाणी पाणी काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना कराव्या, असे आयुक्त म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू व साथरोगाला प्रतिबंध, उपचार व उपाययोजना यासंदर्भात सोमवारच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागासह नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची चांंगलीच झाडाझडती घेतली. ज्या परिसरामध्ये संशयित व निश्चित निदान झालेले डेंग्यूरुग्ण आढळून येत आहेत, त्या परिसरामध्ये त्वरित फवारणी व धूरळणी करण्याचे तसेच डासांची अळी प्रतिबंधक औषध मारण्याचे निर्देश आयुक्त संजय निपाणे यांनी दिले.
शहरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत ए.एन.एम. यांच्या गृहभेटी वाढवून यादरम्यान नागरिकांना स्वाइन फ्लू व डेंग्यू या आजाराची लक्षणे व घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्याबाबत निर्देश आयुक्तांनी दिले. तक्रार आल्यास त्या ठिकाणी त्वरित साफसफाई, फवारणी व धूरळणी करावी आणि ज्या ठिकाणी लार्व्हा आढळत आहेत, अशा ठिकाणी पाणी काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना कराव्या, असे आयुक्त म्हणाले. नव्याने निर्माण होत असलेल्या संकुलांमधील साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे व त्याबाबत स्पष्ट सूचना व नोटीस संबंधित इमारतमालकाला देण्याचे निर्देश आयुक्तांनी सहायक संचालक नगररचना विभागाला दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी, हिवताप अधिकारी डॉ. संदीप बाबर, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, सहाय्यक आयुक्त (मुख्यालय) योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. सीमा नैताम, डॉ. विक्रांत राजूरकर, आरोग्य अधीक्षक अरुण तिजारे, मनपातील डॉक्टर, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते.
कंटेनर त्वरित रिकामे करा
डेंग्यूला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून शहरी आरोग्य केंद्रामार्फत ज्या विभागात तापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, त्या विभागात जलद ताप सर्वेक्षण, पाणीसाठ्याची (कंटेनरची) तपासणी, दूषित आढळून आलेले कंटेनर त्वरित रिकामे करून घेणे, तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीकरिता पाठविणे, जीवशास्त्रीय कार्यक्रमांतर्गत गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही नियमितपणे करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. शाळा, महाविद्यालये, विविध परिसरांमध्ये गटसभा आयोजित करून नागरिकांना स्वाइन फ्लू व डेंग्यूबाबत जनजागृती करावी, असे आयुक्त म्हणाले.