आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर; शासकीय आरोग्य सेवेत समायोजन करण्याची मागणी
By उज्वल भालेकर | Published: October 25, 2023 06:13 PM2023-10-25T18:13:50+5:302023-10-25T18:14:04+5:30
या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच पांगळी झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, तसेच इतरही शस्त्रक्रियांनाही ब्रेक लागला आहे.
अमरावती: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यासाइी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारीका, तांत्रिक, अतांत्रिक असे एकूण १३५३ कर्मचारी हे संपात सहभागी आहेत. या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच पांगळी झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, तसेच इतरही शस्त्रक्रियांनाही ब्रेक लागला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील १५ वर्षापासून आरोग्य विभागामध्ये अनेक डॉक्टर, परीचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसचे अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर सेवा देत असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. कोविड काळातही या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिली. परंतु शासनाने मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल. २० मार्च २०२३ रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दालनामध्ये कृती समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे आश्वासन दिल्याचे कृति समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे याच मागणीसाठी आता राज्यभरात एनएचएम अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. जिल्ह्यातही जवळपास १३५३ अधिकारी, कर्मचारी हे संपामगध्ये सहभागी असून जिल्हा आरोग्य विभागाच्या दालनासमोर हे आंदोलन सुरु आहे. जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.