आरोग्य विभागाला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:47+5:302021-05-06T04:12:47+5:30
चांदूर बाजार : लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे लसींचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे रोष व्यक्त ...
चांदूर बाजार : लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे लसींचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे रोष व्यक्त न करता आरोग्य विभागाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना भगत यांनी केले.
तालुक्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा सहा दिवसांपासून बंद आहे. परिणामी तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्रांना टाळे लागले आहे. आज तरी लसीकरण होईल, या आशेवर, ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक सकाळी ७ पासूनच रांगा लावून उभे असतात. परंतु, लस उपलब्ध नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. लसीबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व मनस्ताप आहे. येत्या दोन दिवसांत लस उपलब्ध झाल्यास प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे, लसींच्या उपलब्धतेनुसार वयोगटानुरूप लस देण्यात येईल. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा केंद्रावर गोंधळ होऊ नये, यासाठी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांनी अंतराचे भान राखावे. मास्क चेहऱ्याला लावावा. लसीकरण केंद्रावर आरोग्य विभागाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना भगत यांनी केले.
१८ वर्षांवरील सर्वच वयोगटातील सर्वच नागरिकांच्या लसीकरणाचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्याचा आरोग्य विभागही लसीकरणासाठी सज्ज आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे लस प्राप्त होण्यास विलंब होत आहे. परिणामी नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. चार ते सहा दिवस लस उपलब्ध न झाल्यास नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होणे क्रमप्राप्त आहे. तेव्हा लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर गोंधळ उडणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.
---------------
राज्यमंत्र्यांकडून निर्देश
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक कोविड रुग्णालयाला भेट दिली. यावेळी लसीच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक उन्हात उभे दिसले असता, त्यांनी तात्काळ नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप टाकण्याचे आदेश दिले.