आरोग्य विभागच घाणीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:27+5:302021-09-23T04:14:27+5:30
(फोटो इंदलकडे बातमीचे कात्रणही घेणे) इंदल चव्हाण- अमरावती : एकीकडे आरोग्य प्रशासन शहरी व ग्रामीण भागात ‘स्वच्छता पाळा, आजार ...
(फोटो इंदलकडे बातमीचे कात्रणही घेणे)
इंदल चव्हाण- अमरावती : एकीकडे आरोग्य प्रशासन शहरी व ग्रामीण भागात ‘स्वच्छता पाळा, आजार टाळा‘चा नारा लावतात. दुसरीकडे स्वत:च दुर्गंधीच्या विळख्यात कर्तव्य बजावतात. ही त्यांची मजबुरी की, प्रशासनाचा हलगर्जीपणा, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक हिवताप, कुष्ठरोग निर्मूलन, फायलेरिया व आरोग्य प्रशिक्षण केंद्राकडे जाण्याच्या मार्गावर शौच करीत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावून ये-जा करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल घेऊन शौचालयाची सोय शासनाने केली खरी, मात्र शौचालयाची सफाई होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक पहाटे त्या रस्त्यावरच शौचास बसतात. त्यामुळे या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, वराहांचादेखील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कर्मचाऱ्यांना सतत दुर्गंधीसह स्वाईन फ्लू आजाराच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. यावर उपाययोजना न केल्यास सामान्यांचा आजार पळविणारा आरोग्य विभागच आजारी पडल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित.
बॉक्स
पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना मनस्ताप
हिवताप कार्यालयासमोरील त्या रस्त्यावर घाण होत असल्याने वराहांचा वावर वाढल्याचे वृत्त लोकमतने ३० नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोपऱ्यात शौचालयाचे नव्याने बांधकाम करून रुग्णांच्या नातेवाईकांची सोय केली होती. मात्र, त्या शौचालयाची दुरवस्था झाल्याने पाय ठेवणेही कठीण झाल्यामुळे लोक रस्त्यावरच प्रात:विधी आटोपताना दिसत आहे. परिणामी पुन्हा रस्त्यावर दुर्गंधी वाढल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाढला आहे.
कोट
मध्यंतरी घाण करणे बंद झाले होते. मात्र, आता पुन्हा रस्त्यावर शौच केली जात असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या कुष्ठरोग निर्मूलन, मलेरिया, फायलेरिया व आरोग्य प्रशिक्षणार्थींना नाकाला रुमाल लावावे लागत आहे. अक्षरश: उलटी होण्याची स्थिती निर्माण होत आहे. यावर उपाय होणे गरजेचे आहे.
- डॉ. वासनिक, सहायक संचालक, कुष्ठरोग
--
रुग्णांकरिता डफरीन रुग्णालयातही शौचालय आहेत. त्यानंतर नातेवाईकांसाठी बाहेरील भागातही सार्वजनिक शौचालयाची सुविधा केलेली आहे. तेथील स्वच्छतेची जबाबदारी सफाई कामगाराकडे आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णांचे नातेवाईक शौचालयाचा विनामूल्य वापर करण्याऐवजी रस्त्यावर जातात.
- डॉ. विद्या वाठोडकर, अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय