सफाई कंत्राटदारांवर आरोग्य विभाग मेहेरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:46 PM2019-07-22T23:46:12+5:302019-07-22T23:46:25+5:30
प्रभागनिहाय सफाई कंत्राटात शहर स्वच्छतेचे काम जोमाने होईल, असा होरा साफ खोटा ठरला आहे. पाऊस मेहरबान असताना ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रभागनिहाय सफाई कंत्राटात शहर स्वच्छतेचे काम जोमाने होईल, असा होरा साफ खोटा ठरला आहे. पाऊस मेहरबान असताना ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे. कंत्राटदारांच्या फॉगिंग मशीन, ग्रास कटर, स्प्रेइंग पंप हे फोटोसेशनपुरतेच मर्यादित असल्याने डासांपासून उदभवणऱ्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
दैनंदिन साफसफाई व वर्गीकृत कचरा गोळा करण्याच्या अनुुषंगाने कंत्राटदाराने उपलब्ध करून द्यावयाचे सफाई कंत्राटदारांकडे आयसीटी बेस (जीपीएस सिस्टीमसह) सहा मिनी टिप्पर, थ्री व्हिलर तीन अॅटो, पाच फॉगिंग मशीन, तीन मेकॅनिकल ग्रास कटर, १० हातगाडी ही महत्त्वाची साहित्य अनिवार्य आहे. गतवर्षी डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूचा प्रकोप झाला. आरोग्य यंत्रणेच्या बेपर्वाईने कित्येक नागरिकांचा नाहक बळी गेला. मात्र, यातूनही आरोग्य विभागाने धडा घेतलेला नाही. अधिकारी व पदाधिकारी आल्यानंतर फक्त फॉगिंग मशीन फोटोसेशनपुरत्या दिसून येतात. नंतर प्रभागात कधीच दिसत नाही. परंतु, महापालिकेचे आरोग्य अधिकारी सराईतपणे सांगतात, आमच्याजवळ नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत. स्वच्छता कंत्राटदारांचे वकीलपत्र महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतले काय, असा नागरिकांचा सवाल आहे. कंत्राटदारांना सर्व रहिवासी, व्यावसायिक, शासकीय निमशासकीय संस्था व धार्मिक स्थळावरून निर्माण होणारा ओला व सुका कचरा वर्गीकृत करून महापालिकेने निश्चित केलेल्या कंटेनरमध्ये किंवा नियोजित ठिकाणी टाकणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे रस्ते, कच्च्या व पक्क्या नाल्या, सर्व्हीस गल्ली, शौचालये, प्रसाधनगृह, कल्व्हर्ट रोेड, क्रास ड्रेन सफाई करणे अनिवार्य आहे. आरोग्य अधिकाºयांसह आरोग्य कर्मचाºयांचे दुर्लक्ष असल्याने शहरात आरोग्याचे धिंडवडे निघाले आहेत.
डास निर्मूलन मोहीम सर्वत्र आहे कुठे?
महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार कंत्राटदाराला जंतनाशक औषधी, जसे लिंडेन पावडर, चुना पावडर, ब्लिचिंग पावडर, फवारणी व धुरळणीकरिता औषधी, फॉगिंग मशीन, स्प्रेपंप खरेदी करणे आवश्यक आहे. संपूर्ण कंत्राट कालावधीत सर्व दिवस धूर फवारणीची कामे करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त सर्वच घरांमध्ये डास निर्मूलन मोहीम राबविणे बंधनकारक आहे. केवळ अधिकारी व पदाधिकाºयांसमोर फॉगिंग मशीनचा रोड शो केल्यानंतर कधी या मशीन दिसतच नाहीत. डासांचा उच्छाद अन् रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य अधिकारी गेले कुठे, असा नागरिकांचा सवाल आहे.
फॉगिंग मशीनद्वारे नियमित धुवारणी सुरू आहे. याबाबत आमच्याजवळ नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत. कुठे तक्रार असल्यास पडताळणी करता येईल.
- डॉ विशाल काळे,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.