उष्माघातासाठी आरोग्य विभाग दक्ष; पीएचसी ५९ कक्ष सज्ज
By जितेंद्र दखने | Published: March 26, 2024 09:36 PM2024-03-26T21:36:14+5:302024-03-26T21:37:00+5:30
आरोग्य यंत्रणा अलर्ट : ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात उपाययोजना
अमरावती : जिल्ह्यातील वाढता उकाडा आणि त्यातच संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नऊ ग्रामीण रुग्णालये, पाच उपजिल्हा रुग्णालये, मनपा क्षेत्रात १३ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय असे एकूण ८७ कक्ष स्थापन केले आहेत.
या वातानुकूलित कक्षामध्ये पाणी, प्राथमिक किट, थंडावा निर्माण करणाऱ्या व्यवस्थेचा यात समावेश आहे. केंद्र सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये प्रत्येक तालुक्याने, प्राथमिक आरोग्य केंद्राने या मार्गदर्शक सूचनांनुसार आपला उष्णता कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे डेथ ऑडिट जिल्हास्तरीय डेथ ऑडिट कमिटीमार्फत नियमित करण्यात यावे. कोणत्याही मृत्यूचे डेथ ऑडिट एक आठवड्याच्या आत करावे, अशाही सूचना आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने उष्माघात कक्ष कार्यान्वित केलेले आहेत.
हीट वेव्ह म्हणजे काय?
हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्सिअसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल, तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे समजावे.
अशी घ्या काळजी
पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी, हॅटखाली ओलसर कपडा ठेवा, ओलसर पडदे, पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
ही घ्या खबरदारी
शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा, उन्हात कष्टाची कामे करू नका, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका, गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका, उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाकघर हवेशीर ठेवा. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स टाळा. खूप प्रथिनेयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.
सध्या वाढता उकाडा आणि त्यातच संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता, आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन केलेले आहेत. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व टीम एमओमार्फत पीएचसीच्या एमओंना दिले आहेत.
- डॉ. सुरेश आसोल, जिल्हा आरोग्य अधिकारी