आरोग्य मंत्र्यांकडून मेळघाटच्या आरोग्य यंत्रणेची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 08:24 PM2019-02-22T20:24:03+5:302019-02-22T20:25:53+5:30
राज्यस्तरीय जंतनाशक मोहिमेला मेळघाटातून प्रारंभ; नेब्युलायझरचे वितरण
चिखलदरा/धारणी (अमरावती) : मेळघाटमधील आरोग्य व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणेसह मेळघाट दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी सकाळी सेमाडोहपासून या दौऱ्याला प्रारंभ झाला. हरिसाल या पहिल्या डिजिटल गावातून राज्यस्तरीय जंतनाशक मोहिमेला आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. लहान मुलांच्या श्वसनासंबंधी संसर्गावर प्रभावी ठरलेले नेब्युलायझर यंत्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण आणि नागरिकांना सकस धान्यवाटपही यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
सर्व विभागांच्या साहाय्याने कुपोषणावर मात करीत मेळघाटातील बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शासनाकडून आरोग्यसेवक, आशा सेविका, ग्रामसेवक, शाळा यांच्या माध्यमातून गावोगाव कुपोषण निर्मूलनासाठी पोषक आहार, आरोग्य जागृती, सुसज्ज आरोग्य केंद्रे याबरोबरच टेलिमेडिसीन, मोटरबाइक, अॅम्ब्यूलन्स असे उपक्रम राबवले जात आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य, महिला व बालविकास, ग्रामविकास आदी विभागांच्या समन्वयातून संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यानी सेमाडोह, हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्यातील प्रत्येक वॉर्ड, औषधी भांडार, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवास यांची पाहणी केली व तेथील अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी आदी उपस्थित होते.
भूमकाकडे नको, दवाखान्यात आणा
आरोग्यमंत्री शिंदे यांनी वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. आपल्या बालकाला किंवा घरातील आजारी व्यक्तीला भूमकाकडे नेऊ नका. दवाखान्यातच आणा. येथेच त्यांच्यावर चांगले उपचार होतील, असेही त्यांनी रुग्णांना सांगितले. मेळघाटात काम करणाऱ्या आशा सेविका रुग्णांना भूमकाकडे जाऊ न देता, त्यांचे मन वळवून त्यांना दवाखान्यात आणत असतात. एका रुग्णाला दवाखान्यात घेऊन येणाºया व स्वत: आजारी पडलेल्या माखला या गावातील आशा सेविका ललिता मावसकर यांच्याशीही आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधला. आरोग्यमंत्र्यांनी नियोजित दौऱ्यात ऐनवेळी बदल करून बैरागड या अतिदुर्गम गावाला भेट दिली. यादरम्यान त्यांनी गावाची पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली.